logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जमिनीच्या वादातून पत्रकार संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळला; एलसीबीची धडक कारवाई, तिघे जेरबंद

सांगली प्रतिनिधी :- तेजस वाळुंज

दैनिक जनप्रवास चे मालक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक संजय भोकरे यांच्या खुनाचा कट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करत उधळून लावला आहे. जमिनीच्या जुन्या वादातून हा कट रचण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली असून या घटनेमुळे पत्रकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून गणेश चंद्रकांत लोखंडे (वय ३३), विराज प्रकाश बुटाले (वय ४१) आणि संग्राम संभाजी फडतरे (वय २७) या तिघांना अटक केली आहे. तर या कटातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा सचिन आवळे हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी हे संजय भोकरे यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तात्काळ हालचाल करत सापळा रचला आणि संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर आली असून त्यांनी हत्येचा कट आखल्याचे उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्टले, चार जिवंत काडतुसे, एक धारदार चाकू आणि एक चारचाकी वाहन असा एकूण सुमारे १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या शस्त्रसाठ्यामुळे आरोपी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची तयारी करत असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
ही धाडसी कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचूक नियोजन आणि तत्परतेने कारवाई करत संभाव्य अनर्थ टाळला. या कारवाईबद्दल पोलिसांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
या घटनेनंतर पत्रकार संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असून पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. तपास पुढे सरकल्यानंतर आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

6
1106 views

Comment