हातकणंगले पोलीस नेमके झोपले आहे की , झोपेचे सोंग घेत आहे ...सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न
कोल्हापूर : 09
सुरेश जाधव ( प्रतिनिधी )
इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर बाळू मामा मंदिर ते माणगाव फाटा दरम्यान रोड लगत असणाऱ्या नूर ट्रेडिंग्स या गोडाऊन मधून अज्ञात चोरट्यांनी शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी मध्यरात्री दोन इलेक्ट्रिक मोटारी लंपास करून चोरट्यांनी हातकणंगले पोलिसांच्या समोर परत एकदा मोठे आव्हान निर्माण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजी येथील फिरोज आलमशा फकीर हे गेल्या नऊ महिन्यापासून बाळू मामा मंदिर ते माणगाव फाटा दरम्यान कोल्हापूर इचलकरंजी रोड लगत गोडाऊन भाड्याने घेऊन प्लास्टिक स्क्रॅप वितळून गट्टे तयार करून बाहेर विक्री करण्याचा व्यवसाय करतात. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे गोडाऊन उघडण्यास आले असता गोडाऊनचा दरवाजा उघडा दिसला. अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचा दरवाजाचे कुलूप तोडून आतील दोन्ही मशीनरीचे चाळीस ते पन्नास हजार किंमतीचे पंचवीस व पाच एचपीच्या दोन इलेक्ट्रिक मोटारीचे बेल्ट तोडून मोटारी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतची फिर्याद त्यांनी हातकणंगले पोलिसात दिली असून घटनास्थळी हातकणंगले पोलीस स्टेशनचे राहुल टोंपे व मशकूर मुल्ला यांनी भेट देऊन पंचनामा केला असून अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत. गंधारीची भूमिका घेतलेल्या हातकणंगले पोलिसांचं मोह चोरट्यांनी मोठे आव्हान निर्माण करत चोरीचे सत्र सुरूच ठेवले असून या पूर्वी इचलकरंजी कोल्हापूर रोड लगत झालेल्या चोऱ्या अशा सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मानगाव फाटा येथे असणाऱ्या वैष्णवी पेट्रोल पंपा नजिक दत्ता बण्णे व अमोल बण्णे यांचे वैष्णवी लाईट हाऊस फोडून चोरट्यांनी इलेक्ट्रिक वस्तूवर मोठ्या प्रमाणात डल्ला मारला आहे. पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी सलीम अत्ताळ यांचे मानगाव फाटा येथील इचलकरंजी कोल्हापूर रोड लगत हॉटेल सहराई नावाचे नाश्ता सेंटर फोडून तीस ते चाळीस हजार रुपयांचा माल हातोहात लंपास केला आहे. याच पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी इमाम मुजावर यांचे कोल्हापूर इचलकरंजी रोड लगत जांभळे पेट्रोल पंपासमोर असलेल्या एसआरटी सेंटर अँड कोल्ड ड्रिंक हाऊस येथेही चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपयांचा माल लंपास केला. दरम्यान दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी इचलकरंजी कोल्हापूर रोड लगत नवं महाराष्ट्र सुतगिरणी समोर साजनी येथील प्रीतम धनराज चव्हाण यांचे बेकरीचे गोडाऊन फोडून पस्तीस ते चाळीस हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. याच इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी साजनी हद्दीत राजस्थान धाब्यासमोर रुकडी येथील विनोद अशोक परीट यांचे चार चाकी गाड्यांचे गॅरेज चोरट्यांनी फोडून चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल लंपास केला आहे. गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी माणगाव फाटा नजिक साजनी हद्दीतील सुरेंद्र रायनाडे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील तिजोरी फोडून घरातील इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. माणगाव साजनी परिसरात चोरट्यांच्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्यामुळे पोलीसही चक्राऊन गेले असले तरी चोरांना पकडण्यात हातकणंगले पोलिसांना अपयश येत असून पोलीस नेमके करतायत तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनता आता विचारू लागली आहे.