logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ज्ञान, संस्कार आणि स्पर्धा परीक्षेची प्रभावी चळवळसाने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राच्या दशकपूर्ती सोहळ्यात गुणवंतांचा गौरव

ज्ञान, संस्कार आणि स्पर्धा परीक्षेची प्रभावी चळवळ



साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राच्या दशकपूर्ती सोहळ्यात गुणवंतांचा गौरव



अमळनेर प्रतिनिधी :

अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा दहावा वर्धापन दिन विविध शैक्षणिक, प्रेरणादायी व विद्यार्थी-केंद्रित कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देत गेल्या दहा वर्षांत अनेक युवकांना विविध शासकीय सेवांमध्ये संधी मिळवून देणाऱ्या या केंद्राच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

शुक्रवार, दि. ८ मे रोजी सकाळी झालेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. स्वागतगीताने वातावरण भारावून गेले.

विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साहित्यिक भाऊसाहेब देशमुख होते तर प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम,
साने गुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ, माजी गट शिक्षणाधिकारी, अशोक बि-हाडे, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक संदीप पाटील, पत्रकार ईश्वर महाजन

विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणाऱ्या वकृत्व स्पर्धा



दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आधुनिक व राष्ट्रीय विषयांवर प्रभावी मांडणी केली.

स्पर्धेचे विषय होते

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एआय

विश्वगुरू भारत

एआय आणि मानवी भविष्य



या स्पर्धेत

प्रथम कल्पेश पाटील

द्वितीय कुशल भदाणे

तृतीय मयूर गजानन पाटील



यांनी यश संपादन केले.



तर आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेत

प्रथम पुष्पराज पाटील

द्वितीय विनायक गुरव

तृतीय घनश्याम नेरकर



यांनी गुणवत्तेची छाप पाडली.

विजेत्या विद्यार्थ्यांना कै. सागर नगांवकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सौ. उज्वला नगांवकर व बापू नगांवकर यांच्या हस्ते रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना राजूदादा फाफोरेकर यांच्या हस्ते रोख बक्षिसे देण्यात आली.



मोफत मार्गदर्शनातून ७८ विद्यार्थी विविध पदांवर



कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक संदीप पाटील यांनी केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला.

दहा वर्षांपूर्वी लावलेले हे छोटेसे रोपटे आज वटवृक्ष बनले आहे. या केंद्रातून आजपर्यंत ७८ विद्यार्थी विविध शासकीय पदांवर पोहोचले आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र आशेचा किरण ठरले आहे, असे ते म्हणाले.

आजच्या काळात मोफत काही मिळत नाही; मात्र हे केंद्र पूर्णतः नि:शुल्क मार्गदर्शन देत असून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची खरी दिशा दाखवत आहे, असेही त्यांनी सांगितले.



यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव



विविध क्षेत्रांत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्यामध्ये

ज्ञानेश्वर पाटील आर्मी

मुंबई मेट्रोमध्ये निवड जळगाव पोलीस भरती

कल्पेश पाटील पोलीस भरती, मंगेश पाटील सेशन कोर्ट निवड, गीतांजली पाटील पोलीस सेवेत निवड

या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सहकार्य करणाऱ्यांमध्ये दीपक वाल्हे वाचनालयाचे संचालक व पत्रकार अजय भामरे यांचा पण सत्कार करण्यात आला. वकृत्व व सामान्य ज्ञान परीक्षेचे परीक्षक म्हणून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक संदीप पाटील उज्वल मार्कंडेय यांनी काम पाहिले.



समाजासाठी वेळ देणे ही मोठी सेवा पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम



प्रमुख अतिथी म्हणून बोलताना पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम म्हणाले,

स्वतःसाठी जगणारे अनेक असतात; पण समाजासाठी वेळ देणारे फार कमी असतात. विजयसिंह पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेला वेळ ही मोठी समाजसेवा आहे. स्पर्धा परीक्षेत सातत्य, प्रामाणिकपणा आणि वाचनाची सवय विद्यार्थ्यांना यशाकडे घेऊन जाते.



नोकरी मिळाली नाही तरी योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी एक चांगला माणूस बनतो, हे या केंद्राचे मोठे योगदान आहे, असेही त्यांनी नमूद केले.



वाचन संस्कृतीमुळेच विद्यार्थ्यांची विचारशक्ती आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते अशोक बि-हाडे



मा. गटशिक्षणाधिकारी अशोक बि-हाडे यांनी आपल्या भाषणातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्राचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी केवळ अभिनंदनपर भाषण न करता विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान देणारे, प्रेरणादायी आणि दिशादर्शक विचार मांडले.

त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दा म्हणजे संधी सर्वांना उपलब्ध आहेत; मात्र त्या संधीचे सोने करण्यासाठी मेहनत, सातत्य आणि योग्य दिशा आवश्यक आहे. आजच्या विद्यार्थ्यांकडे पूर्वीपेक्षा अधिक शैक्षणिक साधने, तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन उपलब्ध असताना त्याचा योग्य उपयोग करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बि-हाडे यांनी दहा वर्षांत या स्पर्धा परीक्षा केंद्रातून अनेक विद्यार्थी विविध नोकऱ्यांमध्ये पोहोचल्याचा उल्लेख करत केंद्राच्या कार्याचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असे मोफत मार्गदर्शन केंद्र म्हणजे मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांनी आपल्या भाषणात वाचन संस्कृतीचे महत्त्व विशेष अधोरेखित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकातील काही ओळी वाचून दाखवत वाचन माणसाला विचार देतं, विचार दिशा देतो आणि दिशा यशाकडे घेऊन जाते, हा संदेश त्यांनी प्रभावीपणे दिला.

त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरते न शिकता स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, ज्ञानाचा आवाका वाढवावा आणि मिळालेल्या संधीचे मूल्य ओळखावे, असा सकारात्मक संदेश स्पष्टपणे दिसून आला.



वाचन संस्कृती टिकली पाहिजे भाऊसाहेब देशमुख



कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा साने गुरुजी वाचनालयाचे माजी चिटणीस भाऊसाहेब देशमुख यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.

यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. स्वतःला पूर्णतः झोकून दिल्याशिवाय यश मिळत नाही. मयूर गजानन पाटीलसारखा नववीतील विद्यार्थी ३५० पुस्तके वाचतो, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे सांगत त्यांनी वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन केले.



- विद्यार्थ्यांनी मानसिकता बदलणे गरजेचे विजयसिंह पवार



स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक विजयसिंह पवार यांनी विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

विद्यार्थी केवळ पोलीस भरतीकडे लक्ष केंद्रीत करतात; मात्र इतर अनेक स्पर्धा परीक्षांकडे दुर्लक्ष होते. विद्यार्थ्यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. आम्ही दर रविवारी वेळ देतो, मार्गदर्शक बाहेरून येऊन शिकवतात; मात्र विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

भारतामधील पहिले विनामूल्य स्पर्धा परीक्षा केंद्र म्हणून या उपक्रमाची ओळख निर्माण व्हावी, ही आमची इच्छा आहे, असेही त्यांनी नमूद केले.



परिपूर्ण ठोकळा पुस्तकाचे प्रकाशन



यावेळी संदीप पाटील लिखित स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या परिपूर्ण ठोकळा या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



निकम साहेबांचा वाढदिवस आणि वर्धापन दिनाचा दुहेरी आनंद



कार्यक्रमादरम्यान पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट प्रिया परदेशी व कुशल भदाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साने गुरुजी ग्रंथालय, मोफत वाचनालयाचे कर्मचारी व स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी विजयसिंह पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

5
1116 views

Comment