स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना दिशा
हडपसरात CFI–BNY उपक्रम उत्साहात; ३४ विद्यार्थी-पालकांचा सहभाग
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना दिशा
हडपसरात CFI–BNY उपक्रम उत्साहात; ३४ विद्यार्थी-पालकांचा सहभाग
पुणे (हडपसर) : Children’s Future India (CFI) आणि BNY यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दि. २६ एप्रिल २०२६ रोजी येथील लेट. रामचंद्र बनकर शाळेच्या सांस्कृतिक सभागृहात हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात ३४ विद्यार्थी व ३४ पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. नववीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, करिअर संधी आणि अभ्यासाचे योग्य नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात सीएफआयच्या प्रोग्राम मॅनेजर अक्षता सावंत व माधुरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमंत्रित पाहुणे पवार सर व भालेराव मॅडम यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
पालकांनीही कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत “या मार्गदर्शनामुळे आमच्या मुलांना योग्य दिशा मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल,” अशी भावना व्यक्त केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता वाढली असून पालकांमध्येही शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे.
समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. कार्यक्रमास सीएफआयचे सोशल वर्कर हेमंत अंदूरकर उपस्थित होते.