logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

देवरीत चोरट्यांचा धुमाकूळ: तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या दोन्ही बोअरवेलची वायर लंपास

कन्हैया क्षीरसागर

देवरी (प्रतिनिधी):

तालुक्यात चोरीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आता चोरट्यांनी थेट सरकारी कार्यालयांना आपले लक्ष बनवण्यास सुरुवात केली आहे. देवरी येथील तालुका आरोग्य अधिकारी (THO) कार्यालयाच्या आवारातील दोन्ही बोअरवेलची विद्युत वायर अज्ञात चोरट्यांनी कापून लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाच्या कामाचा कणा असलेल्या या कार्यालयात पाणीपुरवठ्यासाठी दोन बोअरवेल आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला आणि दोन्ही बोअरवेलला जोडलेली महागडी विद्युत केबल (वायर) कटरच्या सहाय्याने कापून चोरून नेली. सकाळी पाणी येत नसल्याचे लक्षात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीती

गेल्या काही दिवसांपासून देवरी शहर आणि परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कधी घरफोडी, तर कधी दुकानांचे शटर तोडण्याचे प्रकार घडत आहेत. आता थेट सरकारी कार्यालयातील साहित्यावर डल्ला मारल्या गेल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नाही की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पाणीपुरवठा विस्कळीत

बोअरवेलची वायर कापली गेल्याने कार्यालयातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. यामुळे कर्मचारी आणि कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या घटनेची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

प्रशासनासमोर आव्हान:

सरकारी मालमत्तेची अशा प्रकारे चोरी होणे ही चिंतेची बाब आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि या प्रकरणातील दोषींचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तालुकावासीयांकडून केली जात आहे.

34
4441 views

Comment