logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ठाणे जिल्हा परिषदेतील दोन लाचखोर अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले, निवृत्त शिक्षकाकडे केली एक लाखांची मागणी

शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना २० हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. एका निवृत्त शिक्षकाविरोधात सुरू असलेली विभागीय चौकशी बंद करून सेवानिवृत्ती अशंदान व उपदान काढून देण्यासाठी एक लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी ८० हजार रुपये यापूर्वीच घेतले होते तर, उर्वरित २० हजार रुपये घेताना त्यांना पथकाने पकडले.

ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी शंकर सोमनाथ आरे (४४) आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीकांत अनंत खंडागळे (५६) अशी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. तक्रारदार हे ६२ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांच्या विरोधात सुरू असलेली विभागीय चौकशी बंद करण्यासाठी तसेच सेवानिवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभ (अंशदान व उपदान) मंजूर करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तब्बल १ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत २१ एप्रिल २०२६ रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर २२ एप्रिल रोजी सापळा पथकाने रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून उर्वरित २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शंकर आरे यांना पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत श्रीकांत खंडागळे यांचाही सहभाग उघड झाल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे, अशी माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद आहिरे आणि त्यांच्या पथकाने केली. दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे

9
304 views

Comment