गाण्यावर बंदी नाही, मग त्यावर नाचण्यानेच गुन्हा कसा घडला?
'हिडमा' गाण्यावर 'आझाद'चा सवाल
गाण्यावर बंदी नाही, मग त्यावर नाचण्यानेच गुन्हा कसा घडला?
'हिडमा' गाण्यावर 'आझाद'चा सवाल
-April 22, 2026
गडचिरोली : पुण्यातील विश्रांतवाडी येथील शासकीय वसतिगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात नक्षल कमांडर हिडमाचे उदात्तीकरण करणाऱ्या गाण्यावर नृत्य केल्याप्रकरणी गडचिरोलीच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईचा ‘आझाद समाज पक्षा’ने निषेध केला आहे. केवळ आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
पुण्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या किरण गोमासे आणि श्रीनिवास कुमरी या गडचिरोलीच्या दोन विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात एका गाण्यावर नृत्य सादर केले होते. हे गाणे जहाल नक्षलवादी हिडमा याच्याशी संबंधित आहे. ते गाणे वाजवून नृत्य केल्याने देशाच्या एकात्मतेला बाधा पोहोचवल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.
प्नशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी प्रशासकीय कारवाईवर आश्चर्य व्यक्त केले आहे. संबंधित गाणे युट्यूबवर सहज उपलब्ध आहे. जर हे गाणे इतके आक्षेपार्ह किंवा विघातक आहे, तर शासनाने ते तयार करणारा स्टुडिओ, गायक किंवा इंटरनेटवर ते प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई का केली नाही? मुळात या गाण्यावर कोणतीही कायदेशीर बंदी नसताना केवळ त्यावर नृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगार ठरवणे, हा घटनात्मक मूल्यांना हरताळ फासण्याचा प्रकार आहे, असे बन्सोड यांनी म्हटले आहे.
विशेष बाब म्हणजे ही मुले गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या पुण्यात ते समाजकल्याणच्या वसतिगृहात उच्च शिक्षण घेण्यासाठी राहात असल्याची माहिती आहे. हे विद्यार्थी शिक्षण घेणारे असून त्यांचा कोणत्याही प्रकारच्या नक्षलवादी विचारसरणीशी संबंध नाही. त्यामुळे या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक गुन्हे मागे घेण्याची मागणी बन्सोड यांनी केली आहे.