धुळे जिल्ह्यातील तुषार अहिरे यांची MPSC मार्फत नगररचनाकार (वर्ग-१) पदावर निवड
चिपलीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील सुपुत्र चि. तुषार भाईदास अहिरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), मुंबई मार्फत नगररचनाकार वर्ग-१, राजपत्रित अधिकारी या मानाच्या पदावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तुषार अहिरे यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर MPSC सारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवत गाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील तरुणांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन, संस्कार आणि त्याग मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले आहेत. श्री. भाईदास अहिरे व सौ. अहिरे यांनी मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेली मेहनत आज फलदायी ठरली असून, त्यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
नगररचनाकार हे पद अत्यंत जबाबदारीचे मानले जाते. शहर व गावांचा नियोजनबद्ध विकास, नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता आणि गृहनिर्माण क्षेत्रात योगदान देण्याची मोठी जबाबदारी या पदावर असते. तुषार अहिरे यांच्या माध्यमातून समाजाभिमुख व पारदर्शक कामगिरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पुढील शासकीय कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात असून, त्यांच्या हातून जनतेची प्रभावी सेवा घडो, अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे.
— यशवंत शिंदे