logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ठाणे रेल्वे स्थानकाचा होणार आज होणार १७३ वा वाढदिवस साजरा

शहापूर /साजिद शेख
भारतातील पहिल्या रेल्वे सेवेचे ऐतिहासिक केंद्र असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाचा १७३ वा वाढदिवस आज गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारताच्या रेल्वे इतिहासातील सुवर्णक्षण मानली जाणारी पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावली होती. सुमारे ३३.८ किमी अंतर या गाडीने केवळ ५७ मिनिटांत पार केले होते. ‘साहिब, सिंध आणि सुलतान’ या वाफेच्या इंजिनांनी ओढलेल्या १४ डब्यांच्या या गाडीत सुमारे ४०० पाहुणे प्रवासी होते. त्यामुळे १६ एप्रिलला या रेल्वे सेवेचा वाढदिवस प्रवाशी संघटनांकडून गेल्या काही वर्षांपासून साजरा केला जात आहे.

यंदाच्या वर्षीही अशाचप्रकारे ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि पदाधिकारी सुधाकर पतंगराव यांनी रेल्वेचा वाढदिवस करण्याचे ठरविले आहे. हा कार्यक्रम आज १६ एप्रिलला सकाळी ११ वाजता ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकच्या बाजुला असलेल्या जुने रेल्वे इंजिनजवळ होणार आहे.या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी कृष्णा पांचाळ, आयुक्त सौरभ राव, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांची उपस्थिती असणार आहे. या ऐतिहासिक रेल्वेच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा, असे आवाहन प्रवाशी संघटनेने केले आहे.

दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या ठाणे स्थानकाच्या विकासासाठी विविध पायाभूत प्रकल्प राबवले जात आहेत. पश्चिमेकडील सॅटीस पुलानंतर आता पूर्वेकडील सॅटीस पुलाचे कामही वेगाने सुरू आहे. या अंतर्गत सुमारे २.२४ किमी लांबीचा उन्नत मार्ग, १२ मीटर रुंद मार्गिका, तसेच ९ हजार चौ.मी. डेक उभारणी केली जाणार आहे. याशिवाय ११ मजली बहुउद्देशीय इमारतीत वाहनतळ, रेल्वे व बस सुविधा आणि व्यापारी संकुल उभारण्याची योजना आहे.

बोरिबंदर ते ठाणे स्थानक असा प्रवास करणाऱ्या या रेल्वेगाडीचा विस्तार आज भारताच्या प्रत्येक टोकाला झाला आहे. १८५३ मध्ये रेल्वेगाडी धावली. पहिली रेल्वेगाडी चालवणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे १९०० साली इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीमध्ये विलीन झाली आणि तिने आपल्या सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर व अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूरपासून आग्नेयेला रायचूरपर्यंत विस्तारल्या. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी तेव्हाचे ‘बॉम्बे व्हीटी’ (मुंबई) ते कुर्ला हार्बर दरम्यान भारतातील पहिली इलेक्ट्रिक रेल्वे सेवा सुरू करण्यात आली, ज्यामुळे रेल्वेच्या विद्युतीकरणाचा पाया रचला गेला.

19
1174 views

Comment