शाळेत स्वयंसेवक नियुक्तीवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
*तिल्ली मोहगाव (गौरीटोला) येथील शाळेत स्वयंसेवक नियुक्तीवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी*
गोरेगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव (गौरीटोला) येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आलेल्या स्वयंसेवक नियुक्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची लेखी तक्रार पंचायत समिती गोरेगाव येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
तक्रारदार रविंद्र छगनलाल बोपचे (रा. परसाडीटोला, पोस्ट तिल्ली, ता. गोरेगाव) यांनी सादर केलेल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित शाळेमध्ये स्वयंसेवक पदावर करण्यात आलेली नियुक्ती ही कोणतीही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध न करता, अर्ज मागविण्याची प्रक्रिया न राबविता तसेच कोणतीही पारदर्शक निवड पद्धती न अवलंबता करण्यात आल्याची चर्चा ग्रामस्तरावर सुरू आहे. त्यामुळे या नियुक्तीची वैधता व प्रक्रियेची पारदर्शकता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारीत पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, सदर नियुक्तीबाबत ग्रामपंचायत स्तरावर कोणताही अधिकृत ठराव (Resolution) घेण्यात आला आहे की नाही, याबाबतही स्पष्टता नसून, यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, गावामध्ये अनेक सुशिक्षित व पात्र युवक उपलब्ध असताना बाहेरील व्यक्तीची नियुक्ती का करण्यात आली, याबाबतही नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित नियुक्ती प्रक्रियेमध्ये शासनाच्या नियम व मार्गदर्शक तत्वांचे पालन झाले आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात असून, जर नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
या संदर्भात तक्रारदारांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती गोरेगाव यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे गावामध्ये चर्चेला उधाण आले असून, पारदर्शक व नियमबद्ध प्रशासनाची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आता पंचायत समिती प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.