logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गोंदिया जिल्ह्यातील पत्रकार असुरक्षित, यांचा वाली कोण?

पत्रकारावर हल्ला : रेती माफियांना कोणाचा आशीर्वाद? पोलीस व महसूल प्रशासनावर तीव्र प्रश्नचिन्ह?

गोंदिया :तिरोडा तालुक्यात अवैध रेती उत्खननाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत असताना आता थेट पत्रकारांवरच हल्ले होऊ लागल्याने परिस्थिती किती बिघडली आहे, हे स्पष्ट झाले आहे. अवैध रेती माफियांच्या विरोधात सातत्याने बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकार अजय विश्वनाथ नंदागवळी यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ एक गुन्हा नसून प्रशासनाच्या अपयशाची जिवंत साक्ष ठरत आहे.
दि. 30 मार्च रोजी मुंडीपार मार्गावर भरदिवसा घडलेली ही घटना धक्कादायक आहे. मोटारसायकलला कट मारून खाली पाडणे, त्यानंतर मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करत जीव घेण्याची धमकी देणे—हे सर्व प्रकार उघडपणे घडत असताना कायदा व सुव्यवस्थेचा धाक कुठे आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे आरोपींनी स्पष्टपणे “रेती चोरीच्या बातम्या का लावतोस?” असा प्रश्न विचारत हल्ला केला, यावरून या घटनेचा थेट संबंध अवैध रेती उत्खननाशी असल्याचे उघड होते.
रेती माफियांचे वाढते धाडस—प्रशासनाची मौनसंमती?
तिरोडा तालुक्यातील मांडवी, , मुंडीपार आदी भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात यंत्रांच्या सहाय्याने रेती उपसली जाते, तर दिवसाढवळ्या टिप्परमधून तिची वाहतूक केली जाते. या सर्व प्रकारांबाबत अनेक वेळा तक्रारी, बातम्या आणि निवेदने देण्यात आली, मात्र महसूल विभाग व पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही.
यामुळेच रेती माफियांचे मनोबल इतके वाढले आहे की, ते आता उघडपणे पत्रकारांनाही धमकावू लागले आहेत. “बातम्या लावल्यास घरी येऊन मारू” अशी भाषा वापरणे म्हणजे कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच स्पष्ट करते.
पोलीस प्रशासन झोपेत का?
तिरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वारंवार अवैध रेती वाहतूक, चोरी आणि साठेबाजीच्या घटना समोर येत असतानाही नियमित गस्त, नाकेबंदी किंवा कठोर कारवाई का होत नाही? आरोपींना इतका आत्मविश्वास कसा मिळतो? स्थानिक पोलीस यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
पत्रकारांवर हल्ला होणे ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नाही, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट आघात आहे. अशा वेळी पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून आरोपींना धडा शिकवणे अपेक्षित असताना अनेक प्रकरणांमध्ये कारवाईची गती मंद असल्याचे दिसून येते.
महसूल विभागाची जबाबदारी कुठे हरवली?
अवैध रेती उत्खनन रोखण्याची प्राथमिक जबाबदारी महसूल विभागाची असते. मात्र, तिरोडा तालुक्यातील परिस्थिती पाहता हा विभाग पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असताना, टिप्परमधून खुलेआम वाहतूक होत असताना, स्थानिक अधिकाऱ्यांना याची माहिती नसणे अशक्य आहे. तरीही ठोस कारवाई का होत नाही?
काही ठिकाणी कारवाई केल्याचे दाखवले जाते, परंतु ती केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. मोठे साठे आणि मुख्य सूत्रधार मात्र हाताबाहेरच राहतात. यामुळेच “रेती माफियांना कोणाचा आशीर्वाद आहे?” हा प्रश्न अधिकच तीव्रतेने उपस्थित होतो.
पत्रकार असुरक्षित—लोकशाही धोक्यात
पत्रकार हे समाजातील अन्याय, गैरप्रकार उघड करणारे महत्त्वाचे घटक आहेत. जर त्यांच्यावरच हल्ले होत असतील आणि त्यांना संरक्षण मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांची स्थिती काय असेल, याची कल्पनाच करवत नाही. तिरोडा तालुक्यातील ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून संपूर्ण पत्रकारितेवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.
कडक कारवाईची मागणी
या घटनेनंतर नागरिक, पत्रकार संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित आरोपींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी, तसेच अवैध रेती उत्खनन करणाऱ्या संपूर्ण साखळीवर मोठी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तसेच, पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्त पथके तयार करून नियमित छापे, नाकेबंदी आणि कारवाईची मोहीम राबवावी, अन्यथा येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तिरोड्यातील हा प्रकार प्रशासनासाठी इशारा आहे. जर वेळेत कठोर पावले उचलली नाहीत, तर रेती माफियांचे जाळे आणखी मजबूत होईल आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाईल. आता तरी प्रशासन जागे होऊन ठोस आणि निष्पक्ष कारवाई करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील पत्रकार असुरक्षित, यांचा वाली कोण? असा ही प्रश्न निर्माण होते

0
12 views

Comment