जळगाव KVK प्रकरण संसदेत गाजले; खासदार स्मिताताई वाघ यांची चौकशीची जोरदार मागणी
जळगाव KVK प्रकरण संसदेत गाजले; खासदार स्मिताताई वाघ यांची चौकशीची जोरदार मागणी
कृषी विज्ञान केंद्रातील कथित भ्रष्टाचार, निधी गैरवापर व अनियमिततेवर केंद्र सरकारचे लक्ष वेधले
अमळनेर प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र (KVK) येथील कथित भ्रष्टाचार आणि गंभीर अनियमिततेचा मुद्दा खासदार स्मिताताई वाघ यांनी संसदेत ठळकपणे उपस्थित करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्र्यांकडे तात्काळ चौकशीची मागणी करत त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन केले.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) कडून मिळणाऱ्या सरकारी निधीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून, केंद्रातील जुनी झाडे अनधिकृतपणे तोडणे, ट्रॅक्टर व इतर यंत्रसामग्रीचा वैयक्तिक वापर करणे यांसारख्या गंभीर अनियमितता उघड झाल्याचे त्यांनी नमूद केले.
“कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत. मी स्वतः केंद्राला भेट दिली असता अनेक त्रुटी व गैरप्रकार समोर आले,” असे स्मिताताई वाघ यांनी संसदेत स्पष्टपणे सांगितले.
या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, हा मुद्दा यापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेतही मांडण्यात आला होता, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची त्यांनी ठाम मागणी केली.
तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कृषी विज्ञान केंद्रे त्यांच्या मूळ उद्देशानुसार कार्यरत राहतील याची खात्री करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, या मुद्द्यावर कृषी मंत्रालयाकडून लवकरच उत्तर अपेक्षित असून, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संबंधित केंद्राविषयी नाराजी असल्याचे चित्र समोर येत आहे. खासदार स्मिताताई वाघ यांनी हा प्रश्न संसदेत उपस्थित करून शेतकऱ्यांचा आवाज राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला आहे.