महिला दिनानिमित्त श्री शिवाजी महाविद्यालयात निबंध स्पर्धा.!!ओम परीहार प्रथम, वैष्णवी मांगुळकर द्वितीय.!!
मन्सूर शहा धोत्रा भंनगोजी चिखली.:--स्थानिक श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाच्या महिला कक्षातर्फे जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महिला सक्षमीकरण, समाजातील महिलांचे योगदान आणि विद्यार्थ्यांमध्ये महिला विषयक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने "समर्थ महिला, समर्थ भारत" या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक प्रगती आणि राष्ट्रनिर्मितीत महिलांची भूमिका या विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले.
या निबंध स्पर्धेत विज्ञान शाखेतील विद्यार्थी ओम परीहार याने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी मांगुळकर हिने मिळविला, तर तृतीय क्रमांक तुषार कोठाळे यांनी पटकाविला. स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या लेखनातून महिला विषयक जागरूकता, सामाजिक भान आणि राष्ट्राच्या प्रगतीत महिलांचे महत्त्व अधोरेखित झाले.
प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात जागतिक महिला दिनाचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, विमलाबाई देशमुख, महामहिम राष्ट्रपती मुर्मू, प्रतिभाताई पाटील आदी महान महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी जीवनात सक्षमपणे मार्गक्रमण करावे, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्यात आपला वाटा उचलावा, असा संदेश प्रा. डॉ. वनिता पोच्छी तसेच प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे यांनी दिला.
महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या "समर्थ महिला, समर्थ भारत" या विषयावरील निबंध स्पर्धेची सविस्तर माहिती महिला कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. सुनीता कलाके यांनी दिली. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी जागतिक महिला दिनाच्या युरोपातील चळवळीची पार्श्वभूमी स्पष्ट केली. तसेच 1975 पासून युनेस्कोने राबविलेल्या महिला विषयक धोरणांचा उल्लेख करताना, भारतात स्वातंत्र्यानंतर महिला सक्षमीकरणाच्या धोरणांमुळे देशाच्या प्रगतीला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी देशाच्या राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रात महिलांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचाही उल्लेख केला. श्रीमती इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ कार्यरत राहिल्या, तसेच देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदांवर महिलांनी आपली सक्षम छाप उमटविली आहे, असे त्यांनी नमूद केले. केंद्र व राज्य मंत्रिमंडळात महिलांचे वाढते प्रतिनिधित्व, तसेच प्रशासकीय सेवांमध्येही महिलांची वाढती संख्या ही देशाच्या सर्वांगीण प्रगतीची चिन्हे असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात विद्यार्थिनींनीही शिक्षण, प्रशासन, स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवेत पुढे येण्याचे आव्हान त्यांनी केले.
"समर्थ महिला, समर्थ भारत" या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एका आठवड्याच्या कालावधीत निबंध सादर केले. या निबंधांमधून महिला विषयक जागरूकता, समानता, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजातील बदलत्या स्त्रीभूमिकेचे प्रतिबिंब दिसून आले. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष उत्साह लाभला.
निबंध स्पर्धेचे संयोजन कु. वैभवी संतोष मोरगंजे व कु. धारा सुरवसे यांनी केले, तर स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या निबंधांचे परीक्षण प्रा. कु. तृप्ती श्रीरामे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला कक्षातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे महाविद्यालयीन परिसरात महिला सक्षमीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य संचारले.
आहे.