शहीद दिनानिमित्त जि.प. केंद्र शाळा नेर येथे अभिवादन
नेर (ता. धुळे ) : आज शहीद दिन निमित्त जि.प. केंद्र शाळा नेर येथे देशासाठी बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव थापर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या तिन्ही वीर क्रांतिकारकांचे देशासाठीचे योगदान समजावून सांगितले. 23 मार्च 1931 रोजी या तिघांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फाशी स्वीकारली, ही गोष्ट विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे व घोषवाक्यांच्या माध्यमातून देशप्रेम व्यक्त केले. “इन्कलाब जिंदाबाद” च्या घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.