इंदापूर तालुक्याला अवकाळीचा तडाखा; अंकिता पाटील ठाकरे थेट बांधावर, गारपीटग्रस्त शेतीची केली पाहणी !..
इंदापूर तालुका आणि बावडा परिसरामध्ये गुरुवारी सायंकाळी झालेल्या अस्मानी संकटामुळे बळीराजा पुरता कोलमडला आहे. वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार गारपिटीने डाळिंब, द्राक्ष, पेरू आणि केळी यांसारख्या सोन्यासारख्या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी शनिवारी (दि. २१) प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधला आणि धीर दिला.
सुमारे अर्धा तास चाललेल्या या गारपिटीचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा आणि कडवळ, मकवान यांसारखी चारा पिके जमिनीदोस्त झाली आहेत. विशेषतः द्राक्ष बागांमधील मणी गळून पडले असून डाळिंब आणि पेरूच्या फळबागा सध्या फुलोऱ्यात असल्याने मोठी फुलगळ झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्या म्हणाल्या, "बावडा आणि इंदापूर परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान अत्यंत गंभीर आहे. काढणीला आलेली पिके डोळ्यादेखत आडवी झाली आहेत. शासनाने कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता तातडीने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत. शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी यासाठी आपण राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहोत."
या पाहणी दौऱ्यादरम्यान इंदापूर पंचायत समिती सदस्या धनश्री पाटील, सरपंच पल्लवी गिरमे, उपसरपंच रणजीत घोगरे, ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.