गेवराईत तरुणावर प्राणघातक हल्ला; डोक्यावर गंभीर जखम, बरगड्यांना मार – प्रकृती चिंताजनक
बीड, प्रतिनिधी:
बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील राजगल्ली परिसरात एका तरुणावर किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख अरबाज शेख जब्बार (रा. तय्यब नगर, गेवराई) हा तरुण 20 मार्च रोजी सायंकाळी उपास सोडण्यासाठी आवश्यक साहित्य घेण्यासाठी घराबाहेर गेला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी व एक वर्षाची मुलगी होती.
राजगल्ली येथे अचानक 15 ते 20 जणांच्या गटाने त्याच्यावर हल्ला चढवला. लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी करण्यात आलेल्या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तसेच छाती व बरगड्यांवर जबर मार लागल्याने सूज आणि अंतर्गत दुखापत झाल्याचे दिसून येत आहे.
जखमी अवस्थेत त्याला प्रथम गेवराई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जखमीच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.