logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

परिवर्तन : काळाचा अपरिहार्य नियम आणि प्रगतीचे सूत्र... - रावसाहेब शिंदे


"बदल हा निसर्गाचा नियम आहे" – हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण त्याचे गांभीर्य तेव्हाच समजते जेव्हा आपण काळाच्या पडद्यावर मिटून गेलेल्या महाकाय साम्राज्यांकडे आणि कंपन्यांकडे पाहतो. जो काळासोबत बदलतो तोच टिकतो, जो जुन्याला चिकटून राहतो तो स्पर्धेतून बाहेर फेकला जातो. मग ते तंत्रज्ञान असो, व्यवसाय असो वा मानवी स्वभाव.
- इतिहासातील साक्ष: कोडॅक आणि नोकियाचे पतन.‌.‌‌.

​एकेकाळी जगातल्या ९०% फोटो पेपरवर 'कोडक'चे नाव असायचे. पण डिजिटल क्रांती आली आणि कोडकने आपल्या पारंपारिक धोरणांचा हट्ट सोडला नाही. परिणामी, ही कंपनी काळाच्या ओघात विरून गेली. 'नोकिया'चेही तसेच झाले. त्यांची गुणवत्ता उत्तम होती, पण 'स्मार्टफोन'च्या लाटेत त्यांनी स्वतःला बदलले नाही. यातून एकच धडा मिळतो – तुमची आजची गुणवत्ता उद्याच्या प्रगतीची हमी देऊ शकत नाही, जर तुम्ही स्वतःला 'अपग्रेड' केले नाही तर.
- रणनीतीतील बदल: शौर्य आणि चातुर्याचा संगम..
भारतीय इतिहासातही परिवर्तनाचे महत्त्व अधोरेखित करणारे अनेक प्रसंग आहेत...

​भगवान श्रीकृष्ण आणि द्वारका: मथुरेवर वारंवार होणारी आक्रमणे आणि प्रजेचे होणारे हाल थांबवण्यासाठी श्रीकृष्णाने आपली रणनीती बदलली आणि 'द्वारका' वसवली. त्याकाळी त्यांना 'पळपुटा' म्हटले गेले असेल, पण ती माघार नव्हती तर ती एका नव्या सामर्थ्याची सुरुवात होती.

​छत्रपती शिवाजी महाराज आणि पुरंदरचा तह: स्वराज्यावर आलेले संकट ओळखून शिवरायांनी तडजोड स्वीकारली. अनेकांनी टीका केली, पण त्याच तहामुळे मिळालेल्या वेळेचा वापर करून महाराजांनी पुढे ३५० किल्ल्यांचे अभेद्य स्वराज्य उभे केले.

​हे दोन्ही प्रसंग सांगतात की, ध्येय गाठण्यासाठी कधीकधी मार्ग आणि धोरणे बदलावी लागतात. तो भेदरटपणा नसून ती एक प्रगल्भ 'रणनीती' असते.

​- आधुनिक आव्हाने आणि 'कंफर्ट झोन'

​आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे दर पाच वर्षांनी तंत्रज्ञान बदलते. आजची शिक्षण पद्धती, कार्यसंस्कृती आणि जीवनशैली ३० वर्षांपूर्वीच्या तुलनेत पूर्णपणे भिन्न आहे. आजची तरुण पिढी वेगवान आहे, त्यांना निकाल तात्काळ हवे आहेत. अशा वेळी जुन्या चौकटीत अडकून राहणे प्रगतीला मारक ठरते.

​अनेक तरुण नोकरीत सुरक्षितता शोधतात, पण आज कोणतीही नोकरी कायमस्वरूपी 'सुरक्षित' नाही. दररोज नवीन सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान येत आहे. जे तरुण स्वतःला वेळोवेळी शिकत राहतात (Re-skill), तेच या स्पर्धेत तग धरतील. आपण आपल्या 'कंफर्ट झोन'चे गुलाम झालो आहोत. जोपर्यंत आपण नव्या सवयी आत्मसात करत नाही, तोपर्यंत भविष्याचा 'सुवर्णकाळ' आपल्याला गवसणार नाही.

​जेफ बेजोस आणि अमेझॉन: बदलातून उभं राहिलेलं साम्राज्य

​बदलत्या काळाची दिशा ओळखण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेफ बेजोस. १९९४ मध्ये इंटरनेट नुकतेच बाळसं धरत होते. एका साध्या ऑनलाइन बुकस्टोअरपासून सुरू झालेला अमेझॉनचा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या रिटेल प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचला आहे. बेजोस यांनी ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखल्या आणि आपल्या व्यवसायाचे स्वरूप सातत्याने बदलले. आज 'अमेझॉन' हे केवळ दुकान नसून ते तंत्रज्ञान आणि सेवेचे एक जागतिक प्रतीक बनले आहे.

​- निष्कर्ष: भविष्यासाठी सज्ज व्हा!

​येणारा काळ हा 'तंत्रशुद्ध' आणि अत्यंत स्पर्धात्मक असणार आहे. गुणवत्ता असणे ही पहिली पायरी आहे, पण ती योग्य पद्धतीने 'सादर' (Presentation) करणे ही काळाची गरज आहे. एखादा उत्तम आचारी आजही तेवढाच गल्ला कमावतो जर त्याने आपल्या सादरीकरणात आणि व्यवसायात बदल केला नाही.

​त्यामुळे, जर आपल्याला आयुष्यात यशाची चव चाखायची असेल, तर तडजोड आणि धोरणात वेळोवेळी बदल करणे स्वीकारावे लागेल. बदल स्वीकारणे हे केवळ मानसिक धैर्य नाही, तर ते तुमच्या जिवंतपणाचे आणि प्रगतीचे लक्षण आहे. लक्षात ठेवा, जो बदलाला घाबरतो तो इतिहासात जमा होतो, आणि जो बदलाला आपलंसं करतो तो इतिहास घडवतो!

7
1004 views

Comment