घरगुती गॅस सिलिंडरचे ‘नो टेन्शन’ तेल कंपन्यांकडून मागणीनुसार पुरवठा
पुणेकरांचे टेन्शन मिटले! घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्ववत; जिल्हाधिकाऱ्यांचे मह
घरगुती गॅस सिलिंडरचे ‘नो टेन्शन’ तेल कंपन्यांकडून मागणीनुसार पुरवठा
पुणेकरांचे टेन्शन मिटले! घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्ववत; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे अपडेट
Written by aima midiya jan jan ki avaj
पुणे
March 19, 2026 12:40पुणे : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण झालेल्या घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई दूर होण्यास सुरुवात झाली आहे. तेल कंपन्यांकडून मागणीनुसार पुरवठा करण्यात येत असून, येत्या काही दिवसांमध्ये पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेल्या ‘एलपीजी’ पुरवठ्याच्या टंचाईमुळे घरगुती गॅस सिलिंडर मिळण्याची धास्ती नागरिकांमध्ये होती. घरगुती गॅस सिलिंडर पुरेसे असून, त्याची टंचाई नसल्याचे सरकारने वारंवार स्पष्ट केल्यानंतरही शहरात सिलिंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागत होत्या. त्यातून घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार होण्यास सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गॅस एजन्सी आणि तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेऊन सूचना केल्या होत्या.
गॅस एजन्सी किंवा अन्य कोणत्याही ठिकाणांहून सिलिंडरचे वितरण पूर्ण बंद करण्यात आले. तसेच, घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण केवळ ओटीपी प्रणालीद्वारे केल्यानंतर गॅस बुकिंग केल्यानंतर चार दिवसांत (९६ तासांत) सिलिंडर घरपोच देणेही वितरकांना बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर गॅस एजन्सीबाहेरील रांगा कमी होण्यास सुरुवात झाली.भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या तेल कंपन्यांकडून घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण प्रामुख्याने करण्यात येते. मंगळवारी दिवसभरात ८४ हजार ९८७ ग्राहकांनी घरगुती गॅससाठीची नोंदणी केली होती. त्यानुसार ८४ हजार ७५८ सिलिंडरचे वितरण करण्यात आले असून, यापूर्वीच्या स्टाॅकच्या वितरणानुसार ही संख्या ८९ हजारांपेक्षा जास्त होत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, ‘तिन्ही प्रमुख तेल कंपन्यांकडून ९५ हजार ५७१ एवढे सिलिंडर वितरकांना उपलब्ध करून देण्यात आले. दरम्यान, गॅस वितरण पूर्ववत होत असून नागरिकांकडून काही किरकोळ तक्रारी प्राप्त होत आहेत. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शहरासाठी बहुतांश भागाचा पुरवठा पूर्ववत होईल. सध्या मागणी आणि पुरवठा व्यवस्थित आहे,’ असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.गॅस नोंदणी आणि पुरवठ्याची स्थिती
कंपनीचे नाव नोंदणीची संख्या पुरवठा
हिंदुस्तान पेट्रोलिम ३७,११२ ३७,८०४
भारत पेट्रोलियम ४२,५५० ४५,९८३
इंडियन ऑईल ५३२५ ५९७१
एकूण ८४,९८७ ८९,७५८