शिक्षक पदोन्नती प्रक्रियेला तात्काळ स्थगिती द्या; शेख अब्दुल रहीम ची मागणी!
ग्रामविकासमंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे साहेब यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून सादर केले निवेदन
छत्रपती संभाजीनगर/जळगांव
दिनांक १४/०३/२०२६
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेत कायदेशीर आणि तांत्रिक पेच निर्माण झाल्याने, आगामी TET/CTET परीक्षांचे निकाल लागेपर्यंत ही प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी 'महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन' आणि 'हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन'च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेचे राज्य प्रवक्ता तथा संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहे.
`पदोन्नती प्रक्रियेतील मुख्य आक्षेप:`
*१. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन:*
मा. सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निकालानुसार, शिक्षकांना TET पात्रता सिद्ध करण्यासाठी दोन वर्षांची मुदत दिली आहे. ही मुदत अद्याप संपलेली नाही, तरीही घाईने पदोन्नती राबवणे म्हणजे न्यायालयाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणे होय, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
*२. नवनियुक्त शिक्षकांच्या समावेशावर प्रश्नचिन्ह:*
जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या पदोन्नती याद्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक 'नवखे' शिक्षक उमेदवारांचा समावेश आहे. सेवाप्रवेश नियमानुसार, परिविक्षाधीन (Probationary) कालावधीत असलेल्या आणि सेवा कायम (Confirmation) नसलेल्या कर्मचाऱ्यांना थेट पदोन्नती देणे हे नियमांचे उल्लंघन ठरेल.
*३. ज्येष्ठ शिक्षकांवर अन्यायाची भीती:*
फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेली CTET आणि आगामी जून/जुलै २०२६ मधील TET परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अनेक ज्येष्ठ शिक्षक पात्र ठरणार आहेत. जर आताच पदोन्नती प्रक्रिया राबवली, तर या अनुभवी आणि ज्येष्ठ शिक्षकांवर मोठा अन्याय होईल आणि भविष्यात यामुळे कायदेशीर खटले निर्माण होऊन शासनाचा वेळ व पैसा खर्च होईल.
*प्रशासकीय गुंतागुंत टाळण्याची विनंती:*
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केवळ सेवा ज्येष्ठता नव्हे, तर कायदेशीर पात्रता (TET) असणे अनिवार्य आहे. त्यामुळे नवीन निकाल लागेपर्यंत ही प्रक्रिया थांबवून प्रशासकीय पारदर्शकता जपावी, अशी आग्रही मागणी शेख अब्दुल रहीम यांनी केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास न्यायालयीन लढा देण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे...