logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मुंबई–विजयदुर्ग रो-रो फेरीच्या तिकीट दरांवरून प्रवासी संतप्त ; बसपेक्षा दुप्पट-तिप्पट भाडे; तिकीट दर कमी करण्याची कोकणवासीयांची मागणी

मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुंबई–विजयदुर्ग रो-रो फेरी सेवेच्या तिकीट दरांवरून प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जलमार्गाने कोकणातील प्रवास अधिक जलद, आरामदायी आणि सोयीस्कर व्हावा या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली असली, तरी जाहीर करण्यात आलेले तिकीट दर सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर असल्याची प्रतिक्रिया कोकणवासीयांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या तिकीट दरांचा फेरविचार करून ते कमी करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मुंबईतील भाऊचा धक्का (फेरी व्हार्फ) येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग बंदरापर्यंत ही रो-रो फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे. रस्ते मार्गाने मुंबई ते कोकण प्रवास करताना मोठा वेळ लागतो तसेच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर जलमार्गाने प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली. या फेरीमुळे प्रवाशांना तसेच वाहनांसह प्रवास करण्याची सुविधा मिळणार असून कोकणातील पर्यटन आणि व्यापारालाही चालना मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.
मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास रस्ते मार्गाने साधारण दहा ते बारा तासांचा होतो. रो-रो फेरीद्वारे हा प्रवास अंदाजे आठ ते नऊ तासांत पूर्ण होऊ शकतो, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या सेवेचे तिकीट दर जाहीर होताच प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, या फेरीसाठी एका प्रवाशाला सुमारे १८०० ते २५०० रुपये इतके तिकीट मोजावे लागणार आहे. तर चारचाकी वाहनासह प्रवास करायचा असल्यास सुमारे ५००० ते ७५०० रुपये इतका खर्च येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या मुंबईहून कोकणात जाण्यासाठी एसटी किंवा खासगी बसने साधारण सातशे ते हजार रुपये इतका खर्च येतो. त्याच्या तुलनेत रो-रो फेरीचे तिकीट दुप्पट ते तिप्पट असल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरही या तिकीट दरांवर टीका होत असून, एवढ्या खर्चात विमानप्रवासही करता येईल, अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
कोकणातील प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा उद्देश चांगला असला, तरी तिकीट दर जास्त असल्याने ही सेवा सर्वसामान्यांसाठी परवडणारी ठरणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शासनाने आणि संबंधित कंपनीने या तिकीट दरांचा फेरविचार करून ते सर्वसामान्यांना परवडतील असे करावेत, अशी मागणी आता कोकणवासीयांकडून केली जात आहे. दर कमी झाल्यास ही सेवा कोकणातील प्रवाशांसाठी अधिक उपयुक्त आणि लोकप्रिय ठरेल, असे मतही व्यक्त होत आहे.

7
347 views

Comment