logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तेलंगणाचे माजी राज्यपाल जिष्णु देव वर्मा आता महाराष्ट्राचे राज्यपाल ; मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी दिली शपथ

त्रिपुरा येथील माणिक्य राजघराण्यातील सदस्य आणि तेलंगणाचे माजी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबईतील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालय चे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी जिष्णु देव वर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भारतीय नौदलातर्फे नव्या राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.
जिष्णु देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल ठरले आहेत. यापूर्वी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची १२ सप्टेंबर २०२५ रोजी भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा तसेच कुटुंबीय उपस्थित होते. याशिवाय विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, विविध विद्यापीठांचे कुलगुरू तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली राज्यपाल नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखवली. पोलीस बँडने वाजवलेल्या ‘वंदे मातरम’, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर शेवटी ‘वंदे मातरम’ व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जिष्णु देव वर्मा यांची ३१ जुलै २०२४ रोजी तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी २०१८ ते २०२३ या कालावधीत ते त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्या काळात त्यांनी वित्त, ग्रामविकास आणि ऊर्जा यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली.
आधुनिक कला, चित्रकला आणि शिल्पकलेची विशेष आवड असलेले जिष्णु देव वर्मा हे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) या संस्थेच्या त्रिपुरा विभागाचे संयोजक राहिले आहेत. तसेच ईशान्य भारतातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीच्या विविध उपक्रमांचे समन्वयक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते उत्तम लेखक आणि कवी म्हणूनही ओळखले जातात.

7
645 views

Comment