logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मोटारसायकल चोरी करून स्क्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गांधी चौक पोलिसांची कारवाई, ७ गुन्हे उघड

मोटारसायकल चोरी करून स्क्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गांधी चौक पोलिसांची कारवाई, ७ गुन्हे उघड

लातूर : शहरातील गर्दीच्या ठिकाणांहून मोटारसायकली चोरी करून त्या स्क्रॅपमध्ये रूपांतरित करून सुटे भाग विकणाऱ्या टोळीचा गांधी चौक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून चोरी केलेल्या मोटारसायकलींचे सुटे भाग तसेच एक मोटारसायकल असा एकूण सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.

गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांत गुळ मार्केट, भाजी मार्केट तसेच बसस्थानक परिसर या वर्दळीच्या भागांतून मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या चोरीच्या घटनांचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड यांनी पोलीस अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण शाखेला सीसीटीव्ही फुटेज तपासणे तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विशेष पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ६ मार्च २०२६ रोजी सापळा रचून रफिक रहीमसाब शेख (वय ५१, रा. नायगाव उमरगा ता. चाकूर, सध्या एकमिनार मस्जिदजवळ, आजमनगर, लातूर) याला मोटारसायकल चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून हिरो होंडा कंपनीची HF Deluxe (एमएच-२४ एडी-४२२६) ही सुमारे २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.

आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या मोटारसायकली आपल्या साथीदारांकडे देऊन त्या स्क्रॅपमध्ये रूपांतरित करून सुटे भाग विक्रीस काढत असल्याची माहिती समोर आली.

यानुसार पोलिसांनी त्याचे साथीदार नजीर शमीम शेख (वय ३८, रा. लालनगर अंबाजोगाई, सध्या सपकाळनगर, मळवटी रोड, लातूर), तालीफ महमद शेख (वय ३२, रा. लालनगर अंबाजोगाई, सध्या अब्दुल कलाम नगर, लातूर) आणि युसुफ इस्माईल शेख (रा. पिंटू हॉटेलच्या मागे, लातूर) यांना अटक केली.

आरोपींकडून चोरी केलेल्या मोटारसायकली स्क्रॅप करून वेगवेगळे केलेले सहा मोटारसायकलींचे सुटे भाग जप्त करण्यात आले. या कारवाईत एक मोटारसायकल व सहा मोटारसायकलींचे स्क्रॅप केलेले सुटे भाग असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गांधी चौक पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचे ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास गांधी चौक पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे व साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक गणेश चित्ते, सहायक फौजदार राजेंद्र टेकाळे तसेच पोलीस अंमलदार राम गवारे, प्रकाश भोसले, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्रपाटले, शिवा भाडुळे, गोविंद सरवदे, अनिल कज्जेवाड, राहुल दरोडे, दीपक थोटे आणि चालक गोविंद बेंबडे यांचा सहभाग होता.

0
99 views

Comment