जामखेड गोळीबार प्रकरण : फरार ‘चिंग्या’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात....
अहिल्यानगर (जामखेड प्रतिनिधी):
जामखेड शहरातील बीड रोडवरील न्यू कावेरी हॉटेलमध्ये झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याला अखेर स्थानिक गुन्हे शाखा आणि जामखेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. अनेक महिन्यांपासून फरार असलेला हा आरोपी खर्डा परिसरात आल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित अनिल पवार (वय 29, रा. कान्होपात्रानगर, जामखेड) हे 18 डिसेंबर 2025 रोजी बीड रोडवरील न्यू कावेरी हॉटेलमध्ये असताना आरोपी शुभम शहाराम लोखंडे, उल्हास विलास माने उर्फ वस्ताद, अक्षय उर्फ चिंग्या मोरे, अर्शद अमीन सय्यद तसेच 6 ते 7 अनोळखी साथीदारांनी एकत्र येत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या वेळी आरोपींनी पिस्तुलातून गोळीबार करून पवार यांना गंभीर जखमी केले होते.
या घटनेनंतर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील काही आरोपींना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती, मात्र मुख्य आरोपी अक्षय उर्फ चिंग्या मोरे हा फरार होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला तो खर्डा परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
रिपोर्ट : रविराज शिंदे | All India Media Association, अहिल्यानगर
Tags:
#AIMAMedia #अहिल्यानगर #जामखेड #खर्डा #CrimeNews #BreakingNews #MaharashtraNews #PoliceAction