logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

निसर्गायण टिटवाळा (पर्यावरण शिक्षण व पर्यटन) प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न .....

ठाणे / टिटवाळा.
टिटवाळा, दि. २६ फेब्रुवारी २०२६ : श्री सिद्धिविनायक मंदिर, टिटवाळा, पर्यावरण दक्षता मंडळ व एन्व्हायरो व्हिजिल यांच्या संयुक्त विद्यमाने साकारत असलेल्या ‘निसर्गायण टिटवाळा’ (पर्यावरण शिक्षण व पर्यटन) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव गोयल, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका तसेच हर्षाली चौधरी, महापौर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. आयुक्त व मा. महापौर यांनी संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली.

पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेली २६ वर्षे ठाणे व परिसरात पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. श्री सिद्धिविनायक मंदिराच्या सुमारे १२ एकर विस्तीर्ण परिसरात विविध पर्यावरणीय उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.पंचमहाभूतांवर आधारित संकल्पना लक्षात घेऊन ८ ते ९ प्रकारच्या विषयाधारित बागा, सेंद्रिय शेती प्रकल्प, मियावाकी वनसंवर्धन, तलाव, पायऱ्यांची विहीर (बारव), साहसी खेळ, विविध पाळीव प्राणी, पक्षी व कीटक यांचा समावेश असलेले एक समग्र पर्यावरण अनुभव केंद्र म्हणून ‘निसर्गायण टिटवाळा’ विकसित करण्यात येणार आहे. या भूमिपूजन समारंभामुळे प्रकल्पाला औपचारिक प्रारंभ मिळाला असून त्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष सुभाष जोशी यांनी मंदिरातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचा आढावा घेतला. त्यानंतर पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. संजय जोशी यांनी संस्थेच्या २६ वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा सादर केला. घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण शाळा, भटकंती उपक्रम, ‘आपलं पर्यावरण’, ‘निसर्गायण मामणोली’ आणि ‘देवराई’ यांसारख्या प्रकल्पांचा विशेष उल्लेख करण्यात आला.

एन्व्हायरो व्हिजिलचे अध्यक्ष प्रा. विद्याधर वालावलकर यांनी ‘निसर्गायण’ म्हणजे ‘निसर्गाकडे जाणे’ असा अर्थ स्पष्ट करत प्रकल्पाची संकल्पना आणि उद्दिष्टे उपस्थितांना समजावून सांगितली. किमान ३०० शाळांना या उपक्रमाशी जोडून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निसर्ग अनुभव देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले.

मा. आयुक्त अभिनव गोयल यांनी पर्यावरण दक्षता मंडळ व श्री सिद्धिविनायक मंदिर समन्वय समितीचे अभिनंदन करत प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पर्यावरणात केलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन व सर्वाधिक परतावा देणारी गुंतवणूक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ‘पर्यावरण शाळा’ या उपक्रमासाठीही महानगरपालिका सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. धार्मिक पर्यटन व पर्यावरण पर्यटन यांची सांगड घातल्यास हा प्रकल्प अधिक यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मा. महापौर हर्षाली चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हा प्रकल्प त्यांच्या प्रभागात साकारत असल्याचा विशेष आनंद आहे. टिटवाळ्यातील शुद्ध वातावरण जपण्यासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर व पर्यावरण दक्षता मंडळ यांचे कार्य मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
महानगरपालिकेतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली.

कार्यक्रमास मा. उपायुक्त (उद्यान विभाग) संजय जाधव, नगरसेवक संतोष तरे, बंदिश जाधव, अमित धाक्रस यांच्यासह श्री सिद्धिविनायक मंदिर व पर्यावरण दक्षता मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ‘निसर्गायण टिटवाळा’ हा प्रकल्प पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि पर्यटन क्षेत्रात एक आदर्श उपक्रम ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

11
687 views

Comment