विश्व मराठी संमेलनात अमळनेरचा झेंडा फडकला; सुनील जगताप यांच्या दालनाला राज्यस्तरीय गौरव..
विश्व मराठी संमेलनात अमळनेरचा झेंडा फडकला; सुनील जगताप यांच्या दालनाला राज्यस्तरीय गौरव..
अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; वाचनसंस्कृतीचा विश्वस्तरीय गौरव
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
मराठी भाषेच्या वैभवाचा, संस्कृतीचा आणि साहित्यसंपदेचा जागतिक महाउत्सव ठरलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलन २०२६ मध्ये अमळनेरच्या सुपुत्राने अभिमानाची पताका उंचावली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय (महाराष्ट्र शासन) आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे दि. २७, २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत हे भव्य संमेलन संपन्न झाले.
या संमेलनातील ‘विशेष दालनांच्या’ उपक्रमात ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या दालनास द्वितीय क्रमांकाचा उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला. या यशामध्ये नाशिकचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप यांचे नेतृत्व आणि कार्यतत्परता विशेष ठरली. मराठी भाषेच्या सेवेत समर्पित भावनेने उभारलेल्या दालनाने उपस्थित मान्यवरांची व रसिकांची मने जिंकली.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी नाशिकचे सुनील जगताप यांना ‘सर्वोत्तम दालन’ उपक्रमात द्वितीय क्रमांकाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. डॉ. उदय सामंत यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र, शाल-श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक मा. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ग्रंथालय संचालनालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकत होते. या सोहळ्याला प्रख्यात अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचीही उपस्थिती लाभली.
गेल्या तीन दिवसांच्या परिश्रमांचे फळ म्हणून मिळालेला हा बहुमान केवळ एका दालनाचा नव्हे, तर वाचनसंस्कृतीचा गौरव आहे. मराठी भाषा आणि ग्रंथालय चळवळीबद्दल असलेली निष्ठा, नियोजनबद्ध सादरीकरण आणि विषयाची सखोल मांडणी यामुळे संचालनालयाच्या दालनाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
अमळनेरचे सुपुत्र सुनील जगताप हे सध्या नाशिक येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून कार्यरत असून, अनेक वर्षांपासून ग्रंथालय व वाचन चळवळीमध्ये सक्रिय योगदान देत आहेत. एक कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि कल्पक अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक संपूर्ण राज्यभर पसरला आहे. शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करून त्यांच्या कार्याला अधिकृत अधोरेखित केले आहे.
या उल्लेखनीय यशामुळे अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या निमित्ताने अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, उपाध्यक्ष डॉ. माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ तसेच संचालक मंडळ, मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी आणि सर्व सदस्य व वाचन चळवळीचे सर्व सदस्य ,मित्रपरिवार यांनी सुनील जगताप यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
विश्व मराठी संमेलनाच्या व्यासपीठावर अमळनेरचे नाव अभिमानाने उच्चारले जाणे, ही केवळ व्यक्तीगत नव्हे तर संपूर्ण शहरासाठी गौरवाची बाब आहे. मराठी भाषेच्या सेवेत अशीच उंच भरारी घेत राहो, हीच सर्व अमळनेरकरांची अपेक्षा.