logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जुन्नरमध्ये २८ फेब्रुवारीला शासकीय योजना व कायदेविषयक सेवांचा महामेळावा

*ओझर येथे भव्य आयोजन; दुर्गम भागातील नागरिकांना थेट लाभ, मोफत कायदेविषयक मार्गदर्शन उपलब्ध*

वडगाव शेरी समाचार / संदीप शेलार (वरिष्ठ पत्रकार)
पुणे, दि. २४ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि तालुका विधी सेवा समिती, जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी जुन्नर तालुक्यातील ओझर येथे शासकीय योजना व कायदेविषयक सेवांचा भव्य महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. श्री विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा होणार आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे मार्गदर्शन आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र के. महाजन यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. खेड-राजगुरूनगर, घोडेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील आदिवासी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम व उसतोड कामगार, महिला, मुले तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि कायदेविषयक सेवा प्रत्यक्ष पोहोचाव्यात, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या महामेळाव्यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच पुणे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती विशेष उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत ग्रामीण व अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी विधी सेवेचे दालन अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न होणार आहे.
मेळाव्यात विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून पात्र लाभार्थ्यांची नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज प्रक्रियेसाठी थेट मदत करणार आहेत. याशिवाय कायदेतज्ज्ञांकडून मोफत कायदेविषयक सल्ला दिला जाणार आहे. मालमत्ता वाद, कौटुंबिक प्रकरणे, महिला व बालहक्क, कायदेशीर मदत तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे.
दुर्गम वस्त्यांपर्यंत शासनाच्या योजना आणि न्यायसेवा प्रभावीपणे पोहोचाव्यात, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू असून मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांनी या महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश रेवती देशपांडे यांनी केले आहे.

4
99 views

Comment