लोणी ग्रामपंचायतीत उपसरपंचपदी राजेंद्र वाळुंज यांची बिनविरोध निवड; ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत
लोणी-धामणी (प्रतिनिधी: तेजस वाळुंज) –
लोणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र वामन वाळुंज यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच ग्रामपंचायत कार्यालय परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
निवड बैठकीला सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक, ग्रामपंचायत सदस्य राहुल आढाव, प्रकाश गायकवाड, प्रदीप कोचर, स्वाती वाळुंज, आदिताई खोमणे, मंगला ताई गायकवाड, पुष्पाताई रोकडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा दर्शवत निवडीस मान्यता दिली.
माजी सरपंच दिलीप वाळुंज यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योजक मच्छिंद्र वाळुंज, उद्योजक अनिकेत नाईक, व्यापारी संतोष पोखरकर, बाळासाहेब सुतार, प्रतीक कदम तसेच गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या अपेक्षा
नव्या नेतृत्वाकडून ग्रामस्थांनी विविध विकासकामांना गती देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. गावात नियमित व सुरळीत दिवाबत्ती व्यवस्था, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण, स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविणे, गटारींची साफसफाई, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय आणि सर्वांसाठी परवडणाऱ्या दरात फिल्टर पाणी उपलब्ध करून देणे यावर भर द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच गावाला एस.टी. बस थांबा (स्थानक) मंजूर करून देणे, युवकांसाठी क्रीडा व वाचनालय सुविधा, महिला बचतगटांना प्रोत्साहन, शासकीय योजनांचा पारदर्शक व सर्वसमावेशक लाभ मिळवून देणे, तसेच ग्रामपंचायत कारभारात पारदर्शकता राखून प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या.
नवनिर्वाचित उपसरपंच राजेंद्र वाळुंज यांनी, “गावातील प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन पारदर्शक व विकासाभिमुख कारभार करू. प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि नव्या योजना राबवणे हे आमचे प्राधान्य असेल. ग्रामस्थांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी सर्व सदस्यांच्या सहकार्याने काम करू,” असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देत गावाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. लोणी ग्रामपंचायतीच्या या नव्या नेतृत्वाकडून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.