logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! नैमित्तिक रजेसोबत सार्वजनिक सुट्ट्या जोडण्यास कायम मंजुरी

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने स्पष्ट केला आहे. नैमित्तिक रजा (Casual Leave) घेताना त्याच्या आधी, नंतर किंवा रजेच्या कालावधीत येणारे रविवार तसेच सार्वजनिक व सणाच्या सुट्ट्या रजेला जोडून घेण्यास आता कायमस्वरूपी मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्यांचे नियोजन अधिक सोपे होणार आहे.
वित्त विभागाने यासंदर्भात स्पष्ट करताना सांगितले की, २ मार्च १९८१ रोजी तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या परवानगीला आता कायमस्वरूपी स्वरूप देण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले असून, राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांना हे नियम लागू असतील.
नवीन नियमांनुसार, नैमित्तिक रजेच्या सुरुवातीला (Prefix), शेवटी (Suffix) तसेच रजेच्या मधल्या कालावधीत येणारे रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्ट्या रजेला जोडून घेता येणार आहेत. मात्र, या सवलतीसोबतच शासनाने काही स्पष्ट मर्यादाही घालून दिल्या आहेत. एका वेळेस घेतलेली नैमित्तिक रजा आणि त्यासोबत जोडलेल्या सार्वजनिक सुट्ट्या असा एकूण कालावधी कोणत्याही परिस्थितीत ७ दिवसांपेक्षा अधिक असता कामा नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
फक्त अत्यंत अपवादात्मक आणि विशेष परिस्थितीतच ही कालमर्यादा कमाल १० दिवसांपर्यंत वाढविण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कामकाजावर विपरीत परिणाम होऊ नये, याची खबरदारी शासनाने घेतली आहे.
या निर्णयामुळे सुट्ट्यांचे नियोजन करताना उद्भवणारे संभ्रम दूर होणार असून, शासकीय कर्मचाऱ्यांना वैयक्तिक, कौटुंबिक तसेच आरोग्यविषयक कारणांसाठी रजा घेणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच प्रशासनिक पातळीवर एकसमान धोरण राबवले जाणार असल्याने अधिकारी व कर्मचारी यांच्यातील मतभेदही टळण्यास मदत होणार आहे.
हा आदेश राज्यपालांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने वित्त विभागाचे उपसचिव व्यं. दे. पानसे यांनी जारी केला असून, तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.

3
558 views

Comment