logo

*कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज*

*कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज*

*प्रस्तावना*

'क्रांतीची तलवार ही विचारांच्या सहानेवर परजली जाते' असे शहीद भगतसिंग म्हणतात. कुठल्याही बदलाची सुरुवात ही विचारांपासून होते. विचारांशिवायची कृती ही आंधळी तर कृतीशिवाय विचार हे वांझोटे असतात. विचार आणि कृती यांची अचूक सांगड घालत १७ व्या शतकात स्वराज्याच्या निर्मितीची अभूतपूर्व क्रांती घडली. या क्रांतीची मांडणी करीत असताना केवळ शिवरायांच्या लढायांच्या घटना रंगवल्या गेल्या पण शिवरायांच्या अन मावळ्यांच्या क्रांतीकारी तलवारी ज्या विचारांच्या आणि धोरणांच्या सहानेवर परजल्या गेल्या तो विचार अन ती लोककल्याणकारी धोरणं मात्र जाणीवपूर्वक लपवण्याचा प्रयत्न झाला. सत्यशोधकी इतिहास लेखकांनी शिवरायांच्या स्वराज्याचा विचार, त्यामागची धोरणं आपल्या लिखाणातून प्रकाशात आणली. शिवरायांचा लढायांतील पराक्रम हा प्रेरणादायी, स्फुर्तीदायी आणि उर्जा देणारा आहेच. पण हा पराक्रम का केला? कशासाठी केला? हे सांगणारा स्वराज्यविचार खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहे.
राजेशाहीतील एक राजा आज जवळपास चारशे वर्षानंतरही, लोकशाही या राजेशाहीपेक्षा प्रगत राजकीय व्यवस्थेत लोकांना आदर्श वाटतो त्यामागे त्यांची प्रजेबद्दलची ममता, प्रजेच्या कल्याणासाठी आखलेली धोरणं कारणीभूत असतात. स्वराज्याचा लोककल्याणकारी विचार जोपर्यंत या जगात अन्याय, जुलूम अन अत्याचार आहे तोपर्यंत अशा जुलूम, अन्याय अन अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्यांना प्रेरणादायी ठरणारा आहे. महामानवांवरील लेखमालेत आज आपण कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांचे जीवन, कार्य अन विचार समजून घेणार आहोत.

*पार्श्वभूमी*

महामानवाच्या निर्मितीचे अंकूर ते ज्या व्यवस्थेत जन्माला आले, वाढले तिच्या पार्श्वभूमीवर फुटत अन बहरत असतात हे सूत्र आपण महामानव समजून घेण्यासाठी महत्वाचे मानले आहे.
दक्षिण भारतात बहामनी साम्राज्याचे विघटन होवून निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि इमादशाही अशा पाच शाह्या निर्माण झाल्या होत्या. उत्तरतेत मुगलांचे साम्राज्य होते. या सर्व सत्तांमध्ये साम्राज्य विस्तारासाठी आपापसात वारंवार लढाया होत. या लढायांमध्ये सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी जनता सर्वाधिक बेचिराख होत असे. राजांनी करवसूलीसाठी नेमलेले पाटील, वतनदार, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे, जहागीरदार, मिरासदार, खोत हेदेखील मनमानेल तसा कारभार करुन जनतेला लुटत असत. स्त्रीयांच्या अब्रूला कवडीची किंमत उरलेली नव्हती. राजा आणि रयत यात प्रचंड मोठी दरी निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर स्वराज्याच्या विचारांचे अंकूर शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्या मनात निर्माण झाले. शहाजीराजे-जिजाऊ यांनी पेरलेल्या स्वप्नाला सत्यात साकार करण्याचे काम शिवबा आणि त्यांच्या सर्व मावळ्यांनी केले.

*जडणघडण*

१९ फेब्रूवारी, १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. काही काळ ते बंगळूर येथे शहाजीराजे-जिजाऊ यांच्यासोबत राहिले. पुढे शहाजीराजे यांनी आपली पुणे, सुपे, चाकण, इंदापुर, बारामती, शिरोळ ही जहागीर सांभाळण्याचे निमित्त करुन जिजाऊ व शिवबांना पुण्याला पाठवले.
मुरार जगदेवने जाळलेले अन गाढवाचा नांगर फिरविलेले पुणे जिजाऊनी शिवबा व अठरापगड जातीतील पोरांच्या हाताने नांगरले. शिवबांना व त्यांच्या मावळ्यांना मैदानी खेळ, तलवारबाजी, घोडेस्वारी अशा सैनिकी शिक्षणासोबतच मुलकी प्रशासन, न्यायदान इत्यादीची शिकवण जिजाऊनी दिले.
खुद्द जिजाऊनीच शिवरायांच्या गुरुची भूमिका पार पाडत त्यांना आयुष्यभर मार्गदर्शन केले.

*शेतकरीहिताचे निर्णय*

तलवार हातात घेण्याआधी शिवरायांच्या हातात नांगर दिला गेला असल्याने स्वराज्य हे शेतकरी, कष्टकऱ्यांचे असणार आहे हे धोरण स्पष्ट झाले होते. पुढे शिवरायांनी आपल्या अखत्यारीखालील सर्व जमीनीची मोजणी करुन घेतली आणि जमीनीची प्रतवारी निश्चित केली. जमीनीच्या प्रतवारीप्रमाणे आणि पिकेल त्याप्रमाणात शेतसारा लावण्याची नवी करप्रणाली अस्तित्वात आणली. दुष्काळ पडला किंवा कमी पीक झाले तर शेतसारा माफ केला जात असे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणारी अवजारे, बियाणे सरकारातून पुरविली जात असत.
शेतकऱ्यांकडून कर वसून करणाऱ्या वतनदारांचे गडकोट पाडून शिवरायांनी त्यांना रयतेत येवून राहण्याचे आदेश दिले. वतनदारांना करातील हिश्याऐवजी वेतनपद्धती चालू केली. जेणेकरून जास्त टक्केवारी मिळवण्याच्या हेतूने जादाचा कर शेतकऱ्यांवर लादला जावू नये.
आपल्या राज्यातीलच नव्हे तर परराज्यातीलही शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये याकरीता शिवरायांनी 'शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये' अशा सक्त आज्ञा आपल्या सैन्याला दिल्या.
शेतकऱ्यांनी आंबा, फणस, साग आदी झाडे आपल्या पोटच्या लेकरांप्रमाणे जपलेली असतात. त्यामुळे ही झाडे तोडू नयेत. आणि स्वराज्यासाठी त्यांची गरज भासलीच तर योग्य तो मोबदला त्या झाडांच्या मालकांना देवून, त्यांना राजी करुन घेवून अशी झाडे तोडावीत असे आज्ञापत्र काढले.
अशाप्रकारे स्वराज्य हे सर्वप्रकारे शेतकऱ्यांचे, राबणाऱ्यांचे, रयतेचे असावे याबाबत खबरदारी घेतली.

*विज्ञानवादी दृष्टीकोण*

शिवराय हे प्रयत्नवादी, विज्ञानवादी होते. ते धर्मश्रद्ध होते पण धर्मभोळे, देवभोळे नव्हते. शिवरायांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या पण कधीही मुहूर्त बघितला नाही. अमावस्येला अपशकुनी समजतात पण शिवरायांनी अनेक युद्ध मोहिमा अमावस्येला यशस्वी केल्या कारण आमावस्येच्या रात्रीतील काळोखाचा उपयोग करुन शत्रूला गाफील ठेवत चकमा देणे सोपे जाते.
शिवरायांचा दुसरा मुलगा राजाराम हा पालथा जन्मला तेव्हा अपशकुन झाले असा सर्वत्र गोंधळ उडाला. त्यावेळी 'पालथा जन्मला म्हणून काय झाले, दिल्लीची पाथशाही पालथा घालेल' असे विधान करुन अपशकुनाला नाकारत सकारात्मक संकेत दिला.
समुद्रात प्रवास करणे हे धार्मिक पाप मानले जात असे पण त्याच समुद्रात शिवरायांनी 'सिंधुदुर्ग' हा किल्ला बांधला. 'ब्राह्मण म्हणून मुलाहिजा राखणार नाही' असे ठणकावून सांगत आणि अठरापगड लोकांना स्वराज्यात सामील करुन घेत शिवरायांनी वर्ण-जात व्यवस्था नाकारली आणि सर्व माणसं सारखी हा विज्ञानवादी, मानवतावादी दृष्टिकोन ठेवला.
बजाजी निंबाळकर या सक्तीने मुसलमान केल्या गेलेल्या आपल्या मेहूण्याला पुन्हा हिंदू धर्मात घेवून आपली मुलगी सखुबाई हिच्याशी विवाह लावला.
संस्कृतचा अभ्यास करणे पाप समजले जात असतानाच्या काळात संभाजीराजांना संस्कृत शिकवले, ग्रंथलेखनास प्रोत्साहन दिले.
आपल्या माता जिजाऊ यांना सती जावू दिले नाही. शहाजीराजांच्यानंतर स्वराज्याला त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे याची जानीव करुन दिली.

*स्त्रीविषयक दृष्टिकोन*

शिवरायांनी आयुष्यभर परस्त्रीला आई, बहिणीसमान मानले. स्वराज्याच्या सुरुवातीलाच रांझाच्या पाटलाने एका मुलीवर बलात्कार केल्याचे कळताच त्याचे हातपाय कलम करुन त्याचा चौरंगा केला.
कर्नाटक मोहिमेवर असताना शिवरायांचे मेहूणे सखुजीराव गायकवाड यांनी सावित्रीबाई या शत्रू महिलेवर तिचे गड जिंकून बलात्कार केल्याचे कळताच सखुजीरावांचे डोळे काढून कैदेत टाकले.
आपल्या सूनबाई येसूबाई यांना स्वराज्यातील शिक्का-कटारीचे अधिकार देवून स्त्रीला स्वराज्यात सामावून घेतले.
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला नजर केले असता 'आमची माता अशीच सुंदर असत्या तर आम्ही किती सुंदर झालो असतो' असे म्हणत तीचा साडीचोळी देवून सन्मान केला.
शिवरायांनी आयुष्यभर स्वत: स्त्रीयांचा सन्मान केला व स्त्रीयांशी गैरवर्तन करणाऱ्यांना सजा देताना आपला-परका असा भेद केला नाही.

*सैन्यविषयक धोरण*

स्वराज्याचे सैन्य हे खडे सैन्य नव्हते. 'खडे सैन्य' म्हणजे पूर्णवेळ लढाया करणारे सैन्य. शिवरायांनी नागरी जीवन जगणाऱ्या, सामान्य कष्टकरी लोकांना युद्धकला शिकवून सैन्यात भरती केले होते. आपल्या कुटुंबात, लेकरा-बाळांत राहणारे सैन्य जेव्हा परमुलखात मोहिमेवर जात असे तेव्हा त्यांना इतरांच्या धर्माची, कुटुंबाची, बायका-लेकरांची जाणीव असे. काही काळ शेती अन काही काळ युद्धमोहिमा अशी दोन्ही कामे करणारे हे सैन्य असल्याने या सैन्याला परमुलखातील शेतकऱ्यांबद्दलही कणव असे.
काही राजे आपल्या सैन्याला वेतन न देता लुटीतील हिस्सा देत असल्याने असे सैन्य परमुलखातील जनतेला बेचिराख करुन लूट करीत असत. धार्मिक स्थळांची, खासकरुन मंदिरांची तोडफोड करुन तेथील संपत्ती लुटत असत. शिवरायांनी सैन्याला वेतन सुरु केले आणि धार्मिक स्थळ, धार्मिक ग्रंथ, बायका, मुले, गोरगरीब यांना धक्का न पोहोंचवण्याचे आदेश दिले.
शिवरायांनी कुठल्या वस्तूंची लूट करावी याबाबत जी आज्ञा सैन्याला दिली आहे त्यात ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या सर्व वस्तू उंची असून श्रीमंतांकडे सापडणाऱ्या आहेत. याचाच अर्थ गरीबांची लूट होता कामा नये अशा आज्ञा शिवरायांनी सैन्याला दिल्या आहेत.
मोहिमेवर असताना तळ ठोकून विश्रांती घेत असलेल्या आपल्या सैन्याला शिवरायांनी लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे त्यात शिवरायांनी 'तुम्ही शेकोट्या पेटवून चिलीम ओढीत बसाल, त्यात एखादी ठिणगी गवताच्या गंजीवर पडेल अन पेट घेवून अनर्थ ओढावेल. झोपताना दिवे विझवून झोपा. तेलाच्या अमीषाने दिव्याची वात उंदिर पळवेल अन त्या पेटत्या वातीच्या ठिणगीने आग पेटली तर मोठे नुकसान होईल' अशा सुचना दिल्या आहेत. यावरुन शिवराय आपल्या सैन्याच्या हालचालींवर किती बारीक लक्ष ठेवून होते हे कळते.
शिवरायांनी मोहिमेत हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची, विवाहादी जबाबदाऱ्यांची योग्य ती काळजी घेतली. सैनिकातील पराक्रमी व्यक्तींना 'मानकरी', 'भालेराव' अशा उपाध्या देवून सन्मान केला.

*युद्धनिती आणि गनिमी कावा*

शत्रूला चकमा देवून कमी सैन्यबळ असतानाही बुद्धीच्या आणि चातुर्याच्या आधारे युद्ध जिंकण्याचे 'गनीमी कावा' हे तंत्र शिवरायांनी विकसित केले.
अफजलखानाला भेटायला जाताना वाघनखे परिधान करणे, बेसावध शत्रूंवर रात्रीच्या वेळी तुटून पडणे, शाहीस्तेखानावर रात्रीच्या प्रसंगी नियोजनबद्ध हल्ला चढवणे, पन्हाळ्याचा वेडा तोडून येणे, आग्र्याहून चलाखीने सुटका करुन घेणे अशा अनेकप्रसंगी शिवरायांची युद्धनिती दिसून येते.

*शत्रू आणि मित्र*

शिवरायांचे स्वराज्य हे हिंदूंचे असल्याने सर्व हिंदू शिवरांच्या बाजूने तर सर्व मुसलमान विरोधात असे भासवण्याचा प्रयत्न केला जातो. पण वास्तविक अठरापगड जातीतील कष्टकरी मावळे आणि स्वराज्यात सामील झालेल्या अनेक मुसलमान लोकांनी स्वराज्य उभारणीत महत्वाचे योगदान बजावले. उलटपक्षी काही श्रीमंत व अहंकारी मराठ्यांनी शिवरायांना 'राजा' म्हणून स्विकारले नाही व इतर राजांच्या चाकरीत धन्यता मानली. काही ब्राह्मणांनी मिर्झाराजे स्वराज्यावर चालून आला तेव्हा मिर्झाराजाच्या विजयासाठी व स्वराज्याच्या पराजयासाठी 'कोटीचंडी यज्ञ' केला.
शिवराज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्रह्मवृंदांनी विरोध करीत शिवरायांना शूद्र ठरविले. तेव्हा काशीहून गागाभट्टांना पाचारण करावे लागले. पुष्कळ पैसा घेवून गागाभट्टाने राज्याभिषेक केला. महात्मा फुले त्यांच्या शिवरायांवरील पोवाड्यात या घटनेबद्दल म्हणतात - "काशीकर गागाभट्ट घाली डौल धर्माचा, केला खेळ गारुड्याचा I लुटारू शिवाजी लुटला, धाक गृहफौजेचा II". सुरतेच्या व्यापाऱ्यांना, गोऱ्यांना लुटणाऱ्या शिवरायांना धर्माच्या डौलाने लुटले गेले असे ते सांगतात.
तात्पर्य, स्वराज्यातील शत्रूभाव आणि मित्रभाव हा धर्म अगर जातीवर उभा नव्हता तर कष्ट करणारी सामान्य रयत विरुद्ध तिची लूट करणाऱ्या राजकीय व धार्मिक शक्ती असा तो संघर्ष होता.

*गोब्राह्मण प्रतिपालक की कुळवाडी भूषण?*

जगाच्या पाठीवर छत्रपती शिवरायांची ओळख 'रयतेचा राजा' अशी असताना काही इतिहासद्रोह्यांनी शिवरायांना केवळ हिंदू धर्म व गाई, ब्राह्मणांपुरते मर्यादित ठेवले आहे. शिवराय हे धर्मश्रद्ध होते पण कुण्या एका जातीच्या, धर्माच्यासाठी नव्हे तर तमाम कामकरी जनतेच्या हितासाठी त्यांनी स्वराज्य उभे केले. म्हणूनच महात्मा फुले यांनी शिवरायांसाठी 'कुळवाडी भूषण' हे बिरुद वापरले आहे.

*धर्मविषयक दृष्टिकोन*

शिवराय हे धर्मश्रद्ध असले तरी धर्मांधळे किंवा इतर धर्मांचा द्वेष करणारे नव्हते हे त्यांच्या जीवनचरित्रावरुन स्पष्ट होते. आपल्या प्रजेत त्यांनी धर्मावरुन कधीही भेदभाव केला नाही. धर्मावरुन भेदभाव करीत आपल्या प्रजेतील तीर्थयात्रेकरीता येणाऱ्या हिंदू प्रजेवर 'जिझिया' कर लादणाऱ्या औरंगजेबाची कानउघाडणी करणारे पत्र शिवरायांनी पाठवले. या पत्रात ते म्हणतात 'ज्या अल्लाहसाठी मुसलमान बांग देतात आणि हिंदू मंदिरात घंटा वाजवतात, तो परमेश्वर एकच आहे. माणूसकी जाणत नाही तो धर्म कसला?' औरंगजेबाला त्यांचे पूर्वज राजा अकबराच्या धर्मसहिष्णूतेची शिवराय आठवण करुन देतात. शिवरायांनी कुठेही मशीद पाडल्याचे अगर कुराणचा अवमान केल्याचे उल्लेख आढळत नाहीत. उलट धर्मस्थळ व धर्मग्रंथांचा मान राखण्याचे आदेश सैन्याला दिल्याचे आढळते. यावरुन शिवरायांचा धर्मविषयक दृष्टिकोन हा उदात्त आणि उदार असल्याचे दिसून येते.

*शककर्ते शिवराय, राज्यव्यवहारकोषाचे जनक*

नव्या शकाची म्हणजेच नव्याने कालमापन करण्याची सुरुवात करणाऱ्यास 'शककर्ता' म्हणून ओळखले जाते. शिवरायांनी 'शिवशकाची' सुरुवात केली.
राज्याचे सर्व व्यवहार मराठीत व्हावेत यासाठी 'राज्यव्यवहारकोष' बनवून घेतला.

*'मॅनेजमेंट' गुरु*

जगभारातल्या अनेक विद्यापीठातील व्यवस्थापन विषय शिकवताना शिवरायांच्या स्वराज्य व्यवस्थापनाचे धडे दिले जातात. शिवराय हे 'मॅनेजमेंट गुरु' म्हणून जगभर ओळखले जातात.
शिवरायांच्या सर्व मोहिमा अत्यंत नियोजनबद्ध असत.
शत्रूच्या सर्व हालचालींवर हेरांमार्फत लक्ष ठेवले जात असे अन वेळोवेळी व्यूहरचना अद्यावत केली जात असे. कमी मनुष्यबळ, कमी धन घेवून शिवरायांनी एकेकाळचे देशातील बलाढ्य असे साम्राज्य उभारले. हे सगळे शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे शक्य झाले.

*भारतीय आरमाराचे जनक*

शिवराय हे भारतीय आरमाराचे जनक आहेत. समुद्र उल्लंघन करणे हे धर्मशास्त्राने पाप मानले. पण त्याला न जुमानता शिवरायांनी आरमार उभारले. समुद्रात दुर्ग बांधले.

*विषप्रयोग*

शिवराय व शंभूराजे यांच्यावर अनेकवेळा विषप्रयोग झाल्याच्या शंका इतिहासकारांनी व्यक्त केल्या आहेत. इंग्रजांकडून मागवलेल्या वस्तूंच्या यादीत विषाबाधेवरील औषधांचा समावेश आहे, यावरुन ही शंका अजून दाट होते.

*राज्याभिषेक*

बृह्मवृंदांचा विरोध पत्करुन शिवरायांनी अभिषेक करवून घेतला. परंतू, संभाजीराजांवर शाक्त पंथाचा प्रभाव असल्याने पुन्हा दुसऱ्यांदा निश्चल गोसाव्यांकरवी तांत्रिक पद्धतीनेही राज्याभिषेक झाल्याचे आढळते.

*समारोप*

३ एप्रिल, १६८० साली शिवरायांचा रायगडावर मृत्यू झाला.
आपल्या ५० वर्षांच्या आयुष्यात शिवरायांनी नितीसंपन्नता, पराक्रम, धाडस, शौर्य, यशस्वीता, उत्तम व्यवस्थापन, कुशल संघटन, युद्धनीती, न्यायशास्त्र अशा सर्व क्षेत्रात अत्युच्च कामगीरी करुन जगाच्या पाठीवर इतिहास घडवला.
आज आपण सगळेच एका बिकट परिस्थितीतून वाटचाल करीत आहोत. राजकीय पक्षांचे 'कंपनीकरण' होवून लोकशाहीला घराणेशाही, पैसाकेंद्री राजकारण, गुंडगिरीची घूस लागलेली आहे. लोकशाहीतही राजेशाहीतील शिवराय आदर्श, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरत आहेत.
आज कष्टकऱ्यांची लूट करुन, त्यांच्यात जाती-धर्मावरुन फूट पाडत राजकारणी, उद्योगपती अन बडे नोकरशहा शोषण करीत आहेत. अशा परिस्थितीत शिवचरित्रातून, स्वराज्यविचारातून प्रेरणा घेत सर्व जाती-धर्मातील स्त्रीपुरुषांनी संघटीत होत बुलंद लढा उभारला पाहिजे. त्यादृष्टीने वाटचाल करण्याचा संकल्प करुया.
जय जिजाऊ, जय शिवराय.

© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)

('महामानव लेखमाला' या सदरातील चौथा लेख आज शिवजयंती निमित्त पुनः प्रसारित करीत आहे.)

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
66 views