
रमजाननिमित्त उर्दू शाळा सकाळच्या सत्रात भरवा; 'हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन'ची शिक्षण विभागाकडे मागणी!
छत्रपती संभाजीनगर/जळगांव
दिनांक १४/०२/२०२६
पवित्र रमजान महिन्याला लवकरच सुरुवात होत असून, वाढती उष्णता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व उर्दू माध्यमाच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी मागणी हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन चे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम यांनी शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रमजानच्या काळात उर्दू माध्यमाच्या शाळेतील बहुतांश विद्यार्थी आणि शिक्षक उपवास (रोजा) पाळतात. दुपारच्या सत्रात कडक उन्हामुळे उपवास असलेल्या विद्यार्थ्यांचे/ शिक्षकांचे हाल होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन शाळांची वेळ बदलणे आवश्यक आहे...
शैक्षणिक कामकाजावर परिणाम होणार नाही...
RTE Act 2009 नुसार, प्राथमिक शाळांसाठी दररोज ५ तासांचे अध्यापन अनिवार्य आहे. जर शाळा सकाळी ७:३० ते दुपारी १२:३० या वेळेत भरवल्या, तर ५ तासांचे शैक्षणिक कामकाज नियमितपणे पूर्ण होऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांना उन्हाचा त्रासही सोसावा लागणार नाही.
१८ फेब्रुवारीपासून अंमलबजावणीची मागणी
येत्या १८ फेब्रुवारी २०२६ पासून ही वेळ लागू करण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खाजगी अनुदानित/ विनाअनुदानित अशा सर्व उर्दू माध्यमाच्या शाळांना ही परवानगी मिळावी, अशी मागणी शेख अब्दुल रहीम सर यांनी केली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलासा मिळणार आहे...
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी घेतली निवेदनाची दखल!
छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने निवेदनाची दखल घेत विभागातील सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना नियमानुसार आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल परस्पर संबंधितास कळविण्यात यावा.
📌आता शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली यांच्याकडे सर्व उर्दू माध्यमांच्या शाळांचे लक्ष लागले आहे ...