logo

पानिपत! उद्धव ठाकरेंच्या काळातील शिवसेनेचा सर्वात मोठा राजकीय पराभव


कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसठशीत छाप उमटवणारी शिवसेना आज अभूतपूर्व राजकीय संकटात सापडली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्माई नेतृत्वाखाली उभी राहिलेली आणि सत्ता, संघटना व आक्रमकतेची ओळख बनलेली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या काळात मोठ्या पराभवाला सामोरी गेली असून हा पराभव अनेकांच्या मते थेट पानिपताशी तुलना करण्यासारखा आहे.
बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा प्रभाव केवळ मुंबई-ठाण्यापुरता मर्यादित नव्हता. केंद्रात मंत्रीपदे, राज्यात सत्तेत सहभाग, मुंबई, ठाणे, नाशिकसारख्या महापालिकांवर वर्चस्व, महापौरपदाचा मान, जिल्हा परिषद अध्यक्षपदे आणि पंचायत समित्यांवर मजबूत पकड अशी शिवसेनेची ताकद सर्वदूर दिसून येत होती. गावपातळीपासून मंत्रालयापर्यंत शिवसेनेचा आवाज बुलंद होता.
मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हीच शिवसेना हळूहळू दिशाहीन होत गेली. हिंदुत्वाच्या भूमिकेवर झालेला संभ्रम, पारंपरिक शिवसैनिकांपासून वाढत गेलेलं अंतर आणि निर्णयक्षमतेचा अभाव याचा थेट फटका पक्षाच्या संघटनेला बसला. पक्षफुटीनंतर तर परिस्थिती अधिकच गंभीर बनली.
अलीकडील निवडणूक निकालांनी हा ऱ्हास स्पष्टपणे समोर आणला आहे. उबाठा गटाला ना केंद्रात प्रतिनिधित्व उरले, ना राज्यात प्रभावी राजकीय ताकद दाखवता आली. विधान परिषदेत स्वतःच्या संख्याबळावर निवडून येण्याइतके आमदारही उरलेले नाहीत. महापालिकांवरील सत्ता हातातून गेली असून मुंबईसारखा बालेकिल्लाही निसटलेला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल तर उबाठासाठी सर्वाधिक धक्कादायक ठरले. एकाही जिल्हा परिषदेत दोन आकडी सदस्यसंख्या गाठता आली नाही. राज्यभर मिळून जिल्हा परिषद सदस्यांचा आकडा ५० च्या पुढेही जाऊ शकलेला नाही. कधी गावागावात भगवा फडकवणारी शिवसेना आज ग्रामीण महाराष्ट्रात जवळपास अस्तित्वासाठी झगडताना दिसते आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा पराभव केवळ निवडणुकांपुरता मर्यादित नाही. विचारधारेचा त्याग, वारशाबाबतचा संभ्रम आणि संघटनेतील गळती याचे हे परिणाम आहेत. कार्यकर्ते पक्ष सोडून गेले, मतदारांनी पाठ फिरवली आणि शिवसेनेची पारंपरिक ओळख धूसर होत गेली.
आज उबाठा गटासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा आहे तो म्हणजे — पुढे काय? सत्ता नाही, संघटना कमकुवत, जनाधार घटलेला. बाळासाहेबांनी उभारलेलं राजकीय साम्राज्य उद्धव ठाकरेंच्या काळात कोसळल्याची भावना शिवसैनिकांमध्ये तीव्र होत आहे.
राजकारणात चढ-उतार येत असतात, मात्र सध्याची परिस्थिती पाहता हा पराभव इतिहासातील सर्वात मोठ्या धक्क्यांपैकी एक मानला जात आहे. म्हणूनच अनेकांच्या मते, उद्धव ठाकरेंच्या काळातील शिवसेनेसाठी हा पराभव म्हणजेच — पानिपत.

3
57 views