आठ लाखांची लाच, उपअभियंता जाळ्यात
धुळे : शासकीय ठेकेदाराच्या कामाचे बिल अदा करण्याच्या मोबदल्यात त्याच्याकडून ८ लाखांची लाच स्वीकारताना नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपअभियंता नितीन दत्तात्रय इंगळे (वय ५३) यास सोमवारी दुपारी धुळ्यात रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई धुळे लाचलुचपत विभागातर्फे करण्यात आली. धडगाव तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत), धुळे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील २८ गावांमध्ये एलईडी सोलर स्ट्रीटलाईट बसविण्याची कामे केली होती. या कामांसाठी त्यांना जीएसटी वगळता २ कोटी ३७ लाख २९ हजार ३५६ रुपयांची निविदा मंजूर होऊन वर्क ऑर्डर मिळाली होती. कामे मुदतीत पूर्ण केल्यानंतर, तक्रारदार यांना डिसेंबर २०२५ मध्ये त्यांच्या फर्मच्या बैंक खात्यात २ कोटी २ लाख ५ हजार ५२५ रुपये बिल अदा करण्यात आले होते. हे बिल अदा केल्यानंतर आरोपी उपअभियंता नितीन इंगळे याने ठेकेदाराकडे बिलाच्या मोबदल्यात ८ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच, पैसे दिल्याशिवाय पुढील कामांच्या बिलांवर सह्या करणार नाही, अशी धमकी दिली होती. याबाबत तक्रारदार यांनी २७ जानेवारी रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. त्यानुसार दि. ९ रोजी सापळा रचून आरोपी नितीन इंगळे यांला तक्रारदाराकडून ८ लाख रुपये लाचा स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आरोपीविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह दाखल करण्यात आला आहे.