
दादासो जी. एम. सोनार नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात अभिषेक, सामूहिक वाचन व महाप्रसादाचा भक्तिमय उत्सव
दादासो जी. एम. सोनार नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात अभिषेक, सामूहिक वाचन व महाप्रसादाचा भक्तिमय उत्सव
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेर शहरातील दादासो जी. एम. सोनार नगर, मुंडडा नगर–१ परिसरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी परमपूज्य श्री गजानन महाराजांचा १४८ वा पावन प्रकट दिन सोहळा अत्यंत भक्तिभाव, उत्साह आणि शिस्तबद्ध नियोजनासह मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. ‘प्रति शेगाव’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या या मंदिरात प्रकट दिनानिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
माघ वद्य सप्तमी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिन म्हणून श्रद्धापूर्वक साजरा केला जातो. इ.स. १८७८ मध्ये शेगाव येथे महाराज प्रथम प्रकट झाले, अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. त्यांच्या साधेपणात दडलेले अलौकिकत्व, सेवा आणि त्यागमय जीवनकार्य आजही लाखो भक्तांना अध्यात्मिक मार्गावर प्रेरित करत आहे.
“गण गण गणात बोते” हा मंत्रोच्चार दिवसभर मंदिर परिसरात घुमत होता. प्रकट दिन हा केवळ उत्सव नसून आत्मचिंतन, नामस्मरण आणि सेवाभाव जागवणारा पवित्र पर्व आहे, अशी भावना यावेळी भाविकांनी व्यक्त केली.
प्रकट दिनानिमित्त सकाळी विधिवत अभिषेक व पाद्यपूजन दादासो जी. एम. सोनार नगर येथील मालक अविनाश सोनार यांचे बंधू दिलीपजी सोनार व सौ. मेघा दिलीप सोनार (ऑस्ट्रेलिया) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच आशुतोष उपासनी व उत्कर्ष उपासनी यांच्या हस्तेही पूजन पार पडले. यावेळी अशोक भावे, नितीन भावे, केशव पुराणिक, सारंग पाठक, अथर्व कुलकर्णी, मयूरराव गुरुजी, मिलिंद उपासनी, आयुष पिंपळे, केशव वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंदिरातील स्नानपूजा व देखणी सजावट ज्योतीताई पवार, कल्याणीताई भावे आणि नितीन भावे यांनी भक्तिभावाने केली. फुलांची आरास आणि आकर्षक रोषणाईमुळे मंदिर परिसर प्रसन्न आणि आध्यात्मिक तेजाने उजळून निघाला होता.
उद्योजक अविनाश सोनार, दिलीपजी सोनार व सौ. मेघा दिलीप सोनार (ऑस्ट्रेलिया) यांच्या वतीने महाप्रसादाची भव्य व्यवस्था करण्यात आली होती. हजारो भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी श्री गजानन विजय ग्रंथातील २१ व्या अध्यायाचे सामूहिक वाचन ज्योतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भगिनींनी भक्तिभावाने केले. दुपारी पार पडलेल्या महाआरतीवेळी “गण गण गणात बोते” या घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि वातावरण भक्तिरसाने भारावून गेले.
महाप्रसाद वितरणाचे नियोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते. गजानन तरुण भक्तांनी सेवाभावाने महाप्रसाद वाटपात महत्त्वाची भूमिका बजावली. अमळनेर शहरासह तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या असंख्य महिला-पुरुष भाविकांनी दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले.
संत गजानन महाराज सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा. आर. बी. पवार व ज्योतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. गजानन परिवारातील सदस्य, अविनाश सोनार, ,पुजारी रघुनाथ पाटील, विश्वासराव पाटील आदींनी सहकार्य केले.
भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला हा १४८ वा प्रकट दिन सोहळा भाविकांच्या मनात अध्यात्मिक समाधान, श्रद्धा आणि सेवाभावाची नवी ज्योत प्रज्वलित करून गेला.