logo

अहिल्यानगर…महापौरपदी ज्योतीताई गाडे तर उपमहापौरपदी धनंजय जाधव बिनविरोध

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत महापौर व उपमहापौर पदांची निवड प्रक्रिया आज जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्योतीताई अमोल गाडे, तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे धनंजय कृष्णा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महापौर पदासाठी सूचक नगरसेवक गणेश भोसले आणि अनुमोदन नगरसेवक अविनाश घुले, तर उपमहापौर पदासाठी सूचक निखिल वारे आणि अनुमोदन कुमार वाकळे यांनी प्रस्ताव मांडला. निवड प्रक्रिया शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडली.
कार्यक्रमास महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, नगरसचिव मेहर लहारे, तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत सांगितले की, “महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांनी एकत्रितपणे कार्य केल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल. पार्किंग व वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न गंभीर असून त्यावर जिल्हा प्रशासन, आरटीओ आणि महानगरपालिका यांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवाव्यात. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर्स हटवावेत, जेणेकरून नागरिकांमध्ये चांगला संदेश जाईल. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी नगरकरांचा विश्वास संपादन करणारे काम उभे करावे,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
नूतन महापौर ज्योतीताई गाडे यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “आजपासूनच कार्याची सुरुवात करत असून शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू. अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शावर आधारित विकासाचा आराखडा उभा करू,” असे त्या म्हणाल्या.
उपमहापौर धनंजय जाधव यांनी सांगितले की, “महापौर ज्योतीताई गाडे व आम्ही सर्वजण एकत्र येऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन लोकाभिमुख निर्णय घेत नगरकरांची सेवा करणे, हीच माझी प्राथमिकता असेल,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी सर्व नगरसेवकांचे व नागरिकांचे आभार मानले तसेच सभागृहाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीही वाहिली.
या वेळी आमदार संग्राम जगताप माजी नगरसेविका शितलताई जगताप माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, अनिल बोरुडे, संपत बारस्कर, कुमार वाकळे, अविनाश घुले, मनोज कोतकर, डॉ. सागर बोरुडे, सुरेश बनसोडे, प्रकाश भागानगरे, महेश तवले, बाळी पांगरे, दत्ता गाडळकर, महेश लोंढे, ऋग्वेद गंधे, मनोज दुल्लम, सुभाष लोंढे, विजय पठारे, अमोल येवले, मोहित पंजाबी, तसेच नगरसेविका दिपालीताई बारस्कर, पुष्पाताई बोरुडे, शारदाताई ढवण, संध्याताई पवार, गीतांजली काळे, कांताबाई शिंदे, आशाताई डागवले आणि दत्ता कावरे, श्रीपाद छिंदम, नवनाथ कातोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

3
688 views