logo

शिक्षकतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकतर महामंडळाचे ५३ वे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या १ फेब्रुवारी रोजी मुंबईतील चेंबूर येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाची माहिती शिक्षकतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर यांनी दिली.
या अधिवेशनात शिक्षकतर कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत व दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर विचारविनिमय, चर्चासत्रे व परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून, विविध विषयतज्ज्ञ व अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे. राज्यातील शिक्षकतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि हक्क याबाबत थेट शासनदरबारी ठोस भूमिका मांडण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित राहणार असून शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगावकर, पदवीधर आमदार निरंजन डावखरे, आमदार सत्यजित तांबे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने व सरचिटणीस शिवाजी खांडकेर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या अधिवेशनात शिक्षकतर कर्मचाऱ्यांची रखडलेली भरती प्रक्रिया, आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्ष्मीप्रमाणे लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील भरती, जुनी पेन्शन योजना, वैद्यकीय रजा देयकांसह इतर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. याचबरोबर संघटनेची पुढील दिशा, धोरणे व आंदोलनात्मक भूमिका याबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिक्षकतर कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी निर्णायक ठरणाऱ्या या राज्यस्तरीय अधिवेशनास रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकतर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर यांच्यासह अमोल लिंगायत, मंगेश सावंत, राजू झगडे, संतोष शिंदे, उमेश दळवी, संजय पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

8
1173 views