logo

वाळू तस्करांविरोधात कारवाई, ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत



निजामपूर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा

धुळे : साक्री तालुक्यातील बळसाणे येथे छुप्या मार्गाने वाळूची चोरी आणि साठा करणाऱ्यांविरुद्ध निजामपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सुमारे ३७ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन संशयितांविरुद्ध निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

बळसाणे ते देवी रस्त्यावरील एका हॉटेलच्या मागे असलेल्या नूतन धर्मशाळेच्या बाजूला अवैधरीत्या वाळूचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. २६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.

या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता विक्रीच्या उद्देशाने साठवलेली वाळू आणि यंत्रसामग्री मिळून आली. या कारवाईत पोलिसांनी १७, लाख ८२ हजार २०० रुपये किमतीचा ८० ब्रास वाळूचा साठा १५

लाख रूपये किमतीचे विना नंबरचे जेसीबी मशीनसह ४ लाख ७० हजार रूपये किमतीचे निळ्या रंगाचे विनानंबरचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली वाळू गाळण्याची लोखंडी जाळी असा एकूण ३७ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी राकेश अशोक जैन (रा. बळसाणे, ता. साक्री) गिरीष अशोक जैन (रा. बळसाणे, ता. साक्री) या दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३(५) आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ (७), ४८ (८) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वाय. आर. भामरे आणि त्यांच्या पथकाने केली.

8
866 views