logo

मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश – जामखेडच्या कर्मचाऱ्यांनी विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांना दिले निवेदन...


अहिल्यानगर / जामखेड :
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात राज्यभर असंतोष व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील मनरेगा कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सक्रिय सहभागी झाले असून त्यांनी विधान परिषद सभापती मा. राम शिंदे यांना निवेदन सादर केले.
निवेदनाद्वारे मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांकडे सभापती राम शिंदे यांचे लक्ष वेधण्यात आले. अनेक वर्षांपासून अल्प मानधन, सेवा-सुरक्षेचा अभाव, “समान काम – समान वेतन” न मिळणे, PF, विमा व नियमितीकरणाचा प्रश्न प्रलंबित असल्याबाबत कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी S-2 Infotech या खासगी कंपनीमार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून ही प्रक्रिया थांबवावी व मनरेगा कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व पारदर्शक सेवा नियमावली तयार करावी, अशी मागणी करण्यात आली.
या निवेदन प्रसंगी समीर शेख,प्रदीप निमकर,शिवराज जगताप, परसराम उतेकर, दिपक बोराडे,संभाजी ढोले,महेश पेचे, जामखेड तालुक्यातील इतर मनरेगा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदन स्वीकारताना विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन संबंधित विभागाशी चर्चा करून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, मागण्यांवर लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास 23 जानेवारी 2026 पासून जामखेडसह संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनरेगा कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

49
4042 views