
तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेचा भव्य समारोप
अमळनेर हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणादायी शैक्षणिक सोहळा
लेखनातून व्यक्तिमत्त्व विकासाचा संदेश
तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेचा भव्य समारोप
अमळनेर हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणादायी शैक्षणिक सोहळा
अमळनेर प्रतिनिधी : हिंदी भाषेचा गौरव, विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याचा विकास आणि शिक्षकांच्या कार्याचा सन्मान या त्रिसूत्री हेतूने अमळनेर हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय राष्ट्रभाषा हिंदी निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पूज्य साने गुरुजी माध्यमिक पतपेढी, अमळनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत हिंदीप्रेमाचा जागर केला.
ग्रामीण विभागातून लहान गटात ७ व मोठ्या गटातून ७ अशा १४ विद्यार्थ्यांना, तर शहरी विभागातून लहान गटात ५ व मोठ्या गटातून ५ अशा १० विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एरंडोल तालुक्यातील रवंजे व भडगाव तालुक्यातील गुढे येथील शाळांना विशेष सहभाग पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमात ग्रामीण ३८ व शहरी १२ अशा एकूण ५० शिक्षकांना “कृतिशील हिंदी अध्यापक पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
जीवनगौरव पुरस्कार फाफोरे माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त हिंदी शिक्षक एस. एन. पाटील यांना सहपत्नीक प्रदान करण्यात आला. यावेळी वसुंधरा दशरथ लांडगे (विश्वस्तपदी पुनर्निवड), प्रतिभा जाधव (महात्मा फुले जिल्हास्तरीय पुरस्कार) आणि ईश्वर महाजन (दर्पण २०२६ पुरस्कार) यांचाही विशेष सत्कार झाला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना युनियन बँक ऑफ इंडिया चे मुख्य प्रबंधक मयूर पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत सांगितले की, “हिंदी ही केवळ भाषा नाही तर विचार मांडण्याचे सामर्थ्य आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त गुण नव्हे तर अभिव्यक्ती कौशल्य महत्त्वाचे ठरत आहे. निबंध लेखनामुळे विचारांची मांडणी, निरीक्षणशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. ज्या क्षेत्रात आपण कमी पडतो त्या क्षेत्रात अधिक मेहनत घ्या. पालकांचे संस्कार, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द यांची जोड मिळाली तर यश अटळ आहे. मोबाईलपेक्षा पुस्तकांशी मैत्री करा — तेच आयुष्य बदलतात.” त्यांनी हिंदी भाषा प्रसारासाठी बँकेचे सहकार्य भविष्यातही राहील असे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे यांनी हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्याचे कौतुक करत सांगितले, “विद्यार्थ्यांच्या मनातले विचार कागदावर उतरवण्याची प्रेरणा देणे ही मोठी सामाजिक सेवा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात लेखन-वाचनाची सवय कमी होत चालली आहे; अशा वेळी हा उपक्रम विद्यार्थ्यांना विचारशील बनवतो. संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण जपले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही देणगी आपल्याला लेखनातूनच जिवंत ठेवता येईल. हिंदी ही संपर्क भाषा आहे, ती एकतेचे सूत्र आहे. भाषा जपली तर संस्कृती जपली जाते.” त्यांनी भविष्यातही संस्थेचे पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले.
वसुंधरा लांडगे यांनी विद्यार्थ्यांना छंद जोपासण्याचा सल्ला दिला, तर एस. एन. पाटील यांनी हिंदी सेवेसाठी आयुष्यभर कार्यरत राहण्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष शिंदे व प्रशांत वंजारी यांनी केले. आभार प्रदर्शन योगेश्री पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र पाटील, योगेश्री पाटील, दिलीप पाटील, आशिष शिंदे, एन. आर. चौधरी, ईश्वर महाजन, प्रतिभा जाधव, मुनाफ तडवी, प्रदीप चौधरी, कविता मनोरे, प्रशांत वंजारी, प्रतिभा साबे, शशिकांत पवार, एस. बी. पाटील व सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन आशिष शिंदे व प्रशांत वंजारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन योगेश्री पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.