logo

स्वच्छता, प्रबोधन आणि समाजसेवा! 🧹 ​मांगवाडीत साचला 'संस्कारांचा' ठेवा; सात दिवसीय रासेयो शिबिराचा समारोप.

रिसोड: स्थानिक उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाद्वारे मांगवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या 'विशेष श्रम संस्कार शिबिराचा' २३ जानेवारी २०२६ रोजी दिमाखात समारोप झाला. १६ ते २३ जानेवारी या कालावधीत संपन्न झालेल्या या शिबिरात ग्राम स्वच्छता, जलव्यवस्थापन आणि विविध सामाजिक प्रबोधनपर उपक्रमांतून स्वयंसेवकांनी ग्रामीण जीवनाचा जवळून अभ्यास केला.
शिबिराचे उद्घाटन रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. रामेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीसाठी प्रोत्साहित केले. शिबिराच्या दैनंदिन सत्रात प्रभात चिंतन, प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष श्रमदान, ग्राम स्वच्छता आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे गावात स्वच्छता मोहिमेसोबतच स्वच्छतेबाबत जनजागृती फेरीही काढण्यात आली.
शिबिरादरम्यान विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी लक्ष्मण मेहत्रे यांनी कृषी योजना, पत्रकार केशव गरकळ यांनी 'समाज प्रबोधनात पत्रकारांची भूमिका', कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे व संजय उखळकर यांनी 'कीड नियंत्रण', डॉ. गणेश बळी यांनी 'माझा कचरा माझी जबाबदारी', डॉ. नंदेश्वर यांनी 'घर घर संविधान' तर प्रा. मनवर यांनी 'ग्राहक साक्षरता' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ह.भ.प. केशव महाराज वाळके यांनी भजनाच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता व व्यसनमुक्तीचे धडे दिले. विशेष म्हणजे, ग्रामस्थांसाठी पशुचिकित्सा, लसीकरण आणि आरोग्य निदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये डॉ. रामानंद गट्टानी यांचे विशेष सहकार्य लाभले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय उत्तमचंदजी बगडिया होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती राजकुमारजी अग्रवाल, प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी, नेताजी वाळके, गजाननराव वाळके आणि श्रीरामभाऊ वाळके उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रा. डॉ. मंगल खेडेकर यांनी प्रास्ताविकातून शिबिराचा सविस्तर अहवाल सादर केला. यावेळी शिबिरार्थींनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या शिबिरामुळे सामाजिक, आर्थिक आणि नैतिक जाणिवा प्रगल्भ झाल्या असून ग्रामीण समस्या समजून घेण्याची नवी दृष्टी मिळाली आहे.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रासेयो जिल्हा समन्वयक व महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ए.जी. वानखेडे, प्रा. डॉ. एम.पी. खेडेकर, प्रा. संजय टिकार, प्रा. के.के. बुधवंत, प्रा. डॉ. पी.के. नंदेश्वर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, श्री. ओंकार पुरी, श्री. सूरज नरवाडे आणि श्री. सुनील चऱ्हाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरात गावकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

19
1285 views