logo

नववर्ष आणि उत्तरायणचे स्वागत भगवान पशुपतीनाथांची भूमी नेपाळ मधून....

दरवर्षी प्रमाणे येणाऱ्या पाश्चिमात्य नववर्षाच्या सुरुवातीला सुरू होणाऱ्या उत्तरायणचे स्वागत भगवान पशुपतीनाथांची भूमी नेपाळ येथून करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. मकर संक्रांतीच्या पर्वा वरच योगायोगाने भारताचे शेजारी राष्ट्र नेपाळ येथे जाणे झाले. निसर्गाच्या सान्निध्यात वेगवेगळ्या सौंदर्यांनी नटलेल्या ह्या छोट्याशा देशातील भौगोलिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संस्कृती समजून घेण्याची संधी या निमित्ताने मिळाली.
भारतातील जगप्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगांचा एक भाग असलेल्या नेपाळची राजधानी काठमांडू स्थीत भगवान पशुपतीनाथांच्या दर्शनाने सुरुवात झालेल्या यात्रेमध्ये अनेक धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक ठिकाणे पहायला मिळाली. परंतु प्रामुख्याने काठमांडूमध्ये पशुपतीनाथ दर्शना व्यतिरिक्त बुढा निलकंठ , स्वयंभू, यांसारखे काही ठराविक ठिकाणे पहायला मिळतात. काठमांडू पासून साधारणतः 300 किलोमीटरवर असलेल्या पोखरा येथे फेवा लेक, गुप्तेश्वर महादेव , देवी फाॅल, हिमालयाच्या कुशीत उंच डोंगरावर वसलेल्या शंकर भगवान चे दर्शन, काठमांडू पोखरा रस्त्यावर येणाऱ्या उंच पर्वत शिखरांवर बसलेल्या मनोकामना मातेचे दर्शन घेण्यासाठी लिफ्टने साधारणपणे 10 मिनीटांचा प्रवास करुन जावे लागते.हिमालयाच्या कुशीत वसलेल्या ह्या छोट्याशा देशाला सर्व बाजूंनी पर्वत रांगांनी वेढलेले आहे.छोट्यामोठ्या नद्या, डोंगर आणि गुहांमध्ये दडलेले नैसर्गिक रहस्ये पर्यटनाचा आनंद द्विगुणित करतात.
नेपाळी आणि भारतीय चलनात होणारे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार भारतीय चलनाचे नेपाळ मध्ये असणारे महत्व पटवून देते. परदेशी चलनाला महत्व देणारे आपण भारतीय आपल्या चलनाचे दुसऱ्या देशात असणारे महत्व बघून खूश झाल्याशिवाय राहत नाही. गेल्या काही दिवसांपासून स्वच्छतेचे महत्त्व समजणाऱ्या आपल्या भारतीयांपेक्षा पहाडी लोक थोडे पुढे वाटतात. शहरांपासून डोंगर माथ्यावर असणारे पक्के रस्ते, शहरांमध्ये छोट्या गल्ल्या, रस्त्यांवर असणारे पेव्हर ब्लॉक्स सौंदर्यात भर घालतात. मिस्त्र पद्धतीने स्विकारलेल्या भारतीय संस्कृतीमध्ये शाकाहारी लोकांसाठी येथे खाण्याचे वांदे होऊ शकतात. मांसाहारी लोकांसाठी एक पर्वणीच आहे.राहण्यासाठी आपल्या बजेटमध्ये व्यवस्था होऊन जाते.खरेदीच्या बाबतीत दिल्ली , मुंबईतील मोठमोठे मार्केट उजवी वाटतात. एकंदरीत पर्यटन आणि धार्मिक दृष्टीकोनातून सहलीचे आयोजन करण्यास हरकत नाही.
आपापल्या कुवतीनुसार रस्ता किंवा हवाई मार्गाने प्रवास व्यवस्था आहेत. दिल्ली पासून काठमांडू पर्यंत हिमालयाच्या कुशीतून प्रवास करायचा असेल तर हवाई सफर करावी लागेल. हौस आणि बजेट यांचा समतोल राखत नियोजन करणे आपल्यावर अवलंबून आहे.
बाकी शेवटी एकच...... सारे जहाॅसे अच्छा हिंदुस्थान हमारा

3
48 views