logo

*जीवनगट्टा येथे आळिंबी उत्पादन युनिटची माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी* *महिला बचत गटांच्या उपक्रमाचे कौतुक, शासनाकडून आवश्यक सहकार्याचे आश्वासन*

एटापल्ली : दि. 15 जानेवारी 2025
मौजा जीवनगट्टा, तालुका एटापल्ली, जिल्हा गडचिरोली येथे माननीय जिल्हाधिकारी श्री. अविशांत पंडा (IAS) यांचा दौरा पार पडला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जीवनगट्टा येथील जय पेरसापेन महिला बचत गट यांना प्रधानमंत्री खनिकर्म कल्याण योजना अंतर्गत अनुदानातून उभारण्यात आलेल्या आळिंबी (मशरूम) उत्पादन युनिटची पाहणी करून महिलांना मार्गदर्शन केले.
या योजनेअंतर्गत जीवनगट्टा येथील एकूण सहा महिला बचत गटांना आळिंबी उत्पादन युनिटचा लाभ देण्यात आला असून, सर्व युनिटची तयारी पूर्ण झाली आहे व प्रत्यक्ष उत्पादन सुरू झालेले आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष युनिटची पाहणी करून महिलांच्या कार्याचे कौतुक केले. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आळिंबी उत्पादन युनिटमुळे ग्रामीण भागातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होणार असून आर्थिक उत्पन्नात वाढ होईल, त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. तसेच पौष्टिक मूल्यांनी समृद्ध असलेले मशरूम सहज उपलब्ध होऊन नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, असे मनोगत माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माननीय उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एटापल्ली श्री. अमर राऊत (IAS), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली श्रीमती प्रीती हिरळकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इब्रान शेख, तहसीलदार एटापल्ली श्री. हेमंत गांगुर्डे, गट विकास अधिकारी एटापल्ली डॉ. आदिनाथ आंधळे, विविध शासकीय अधिकारी-कर्मचारी, जीवनगट्टा येथील महिला बचत गटांच्या सदस्य, शेतकरी उत्पादन कंपनीचे सभासद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत, आत्मा प्रकल्प संचालक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका कृषी अधिकारी एटापल्ली यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर यांनी आळिंबी उत्पादन युनिटविषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. या उपक्रमातून महिलांना मशरूमपासून विविध पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करून समाजाला पोषणमूल्ययुक्त अन्न पुरवता येईल, तसेच कृषी विभागामार्फत विविध योजनांचा लाभ देऊन दुर्गम व ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. वंदना गावडे यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील महिलांना गावातच रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वतः गटामार्फत मोहाचे लाडू, ज्वारीचे लाडू तसेच विविध पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करून संपूर्ण देशभर विक्री करत असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. अरुण वसवाडे, तालुका कृषी अधिकारी एटापल्ली यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी श्री. एच. के. राऊत, बीटीएम श्री. समीर पेदापल्लीवार, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. बोरे, श्री. गिरासे तसेच कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

10
1120 views