
फुणगूस मोहल्ला–भोसलेवाडीतील पाणीप्रश्न ऐरणीवर
साठवण टाकीच्या दुरवस्थेमुळे दूषित पाण्याची भीती; नागरिकांमध्ये चिंता
[फुणगुस | १३ जानेवारी २०२६ ]
फुणगूस मोहल्ला आणि भोसलेवाडी परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न अलीकडे गंभीर बनला असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या पाणी व्यवस्थापनावर नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू आहे. अर्धा लाख रुपयांहून अधिक वीज देयक वेळेत न भरल्याने महावितरणने पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाची वीज जोडणी खंडित केली. परिणामी, विहिरीत पाणी उपलब्ध असतानाही केवळ प्रशासकीय दुर्लक्षामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली.
ही बाब प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने हालचाली करून महावितरणकडे पाठपुरावा केला आणि वीज जोडणी पुन्हा सुरू करण्यात आली. पाणीपुरवठा पूर्ववत झाला असला, तरी या घटनेमुळे पाणीव्यवस्थेशी संबंधित आणखी गंभीर प्रश्न उजेडात आले आहेत.
गावाला जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करणारी साठवण टाकी जंगल परिसरात असून तिची अवस्था अत्यंत दयनीय आहे. काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या टाकीभोवती आज झाडे, झुडपे व गवताचे साम्राज्य पसरले आहे. टाकीच्या वरच्या भागावरही गवत व वनस्पती उगवलेल्या दिसून येतात. इतकी दुर्लक्षित अवस्था आहे की, नवख्या व्यक्तीस ही टाकी शोधणेही अवघड ठरेल.
टाकीची बाह्य अवस्था अशी असेल, तर आतल्या स्वच्छतेची स्थिती काय असेल, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. साठवण टाकीत गाळ, शेवाळ किंवा कचरा साचल्यास पाणी दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे दूषित पाणी पिण्यात गेल्यास अतिसार, कावीळ, टायफॉईडसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, असे आरोग्यतज्ज्ञ वारंवार सांगत आले आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि सार्वजनिक आरोग्य नियमांनुसार नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे ही ग्रामपंचायतीची मूलभूत जबाबदारी आहे. पाणी साठवण टाक्यांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण (क्लोरीनेशन) आणि त्याची नोंद ठेवणे आवश्यक असते. मात्र या टाकीची शेवटची स्वच्छता कधी करण्यात आली, याची नोंद ग्रामपंचायतीकडे उपलब्ध आहे का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आणि शंका दोन्ही आहेत. दप्तर तपासणीबरोबरच प्रत्यक्ष जागेवर पाहणी झाल्यासच वस्तुस्थिती स्पष्ट होईल आणि नागरिकांच्या मनातील भीती खरी की खोटी, हे समोर येईल.
नागरिकांच्या आरोग्यावर भविष्यात कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी वेळेत ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. साठवण टाकीची तातडीने स्वच्छता करणे, परिसरातील झाडी काढणे, पाणी गुणवत्तेची तपासणी करून त्याचा अहवाल जाहीर करणे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
पाणी आणि मानवाचे आरोग्य यांचा अतूट संबंध आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न तात्पुरत्या उपायांनी नव्हे, तर दीर्घकालीन नियोजन, पारदर्शकता आणि जबाबदारीच्या दृष्टीने हाताळणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने पाहून ठोस पावले उचलेल का, याकडे फुणगूस मोहल्ला आणि भोसलेवाडीतील ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत.
➖➖➖➖➖➖