logo

सुभाष रोड ‘दुकानदारांच्या मनमानीचा अड्डा’ बनला! ६ फूट परवानगी, १५ फूट दुकानदारी; नियम पाळणारे व्यापारी भरडले

बीड शहरातील सुभाष रोड सध्या काही मोजक्या दुकानदारांच्या उद्धट अतिक्रमणामुळे अक्षरशः गुदमरला आहे. नगरपालिकेने स्पष्टपणे फक्त ६ फूट जागा वापरण्याची परवानगी दिली असताना, काही दुकानदारांनी सरळसरळ कायदा फाट्यावर मारत १५ ते १५ फूटपर्यंत दुकान वाढवून कब्जा केला आहे.
या मनमानीमुळे कायद्याचे पालन करणारे प्रामाणिक दुकानदार अडचणीत सापडले आहेत. “आम्ही नियमात बसून व्यवसाय करतो, पण बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे आम्हालाच मूर्ख ठरवलं जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया येथील व्यापाऱ्यांनी दिली.
अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांनी रस्ताच आपल्या दुकानाचा भाग बनवला आहे. काही ठिकाणी दुकानदारांनी माल थेट रस्त्यावर मांडला असून, टू-व्हीलर वाहनेही रस्त्यावर उभी करून सुभाष रोड आणखी अरुंद केला आहे. परिणामी, वाहतूक कोंडी, भांडणे आणि अपघात हे रोजचेच झाले आहेत.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, नगरपालिकेचे अधिकारी याकडे डोळेझाक करत आहेत का? असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत. नियम पाळणाऱ्यांवर दंड, तर नियम मोडणाऱ्यांना मोकळे रान — असा दुजाभाव का? सर्व दुकानदारांसाठी एकसारखा कायदा लागू नसेल तर कायद्याचा अर्थच काय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी तात्काळ अतिक्रमण हटवून बेकायदेशीर दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, सुभाष रोडवरील हा अन्याय थांबवण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

103
4586 views