logo

MIT ADT विधापीठात रंगणार राष्ट्रीय आंतर विद्यापीठीय स्पर्धेचा थरार

पुणे, दि. ९ जानेवारी २०२६ :
एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आठव्या ‘विश्वनाथ स्पोर्ट्स मीट २०२६’ या देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा आठवा हंगाम दि. १३ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान विद्यापीठाच्या भव्य व अत्याधुनिक क्रीडा संकुलात पार पडणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते तसेच ऑलिम्पिक कास्यपदक विजेते मा. विजेंद्र सिंग यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाची अध्यक्षता एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड करणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार संस्थेच्या उपमहासंचालक व वरिष्ठ कार्यकारी संचालक वनिता कुमार, मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड तसेच डॉ. सुनीता कराड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ दि. १८ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून, यावेळी पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त तसेच आशियाई सुवर्णपदक विजेते कॅप्टन बजरंग लाल ताखर (व्हीएसएम) यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. याप्रसंगी ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कारप्राप्त जलतरणपटू वीर धवल खाडे तसेच मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोलर स्केटिंगपटू स्मिता शिरोळे यादव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या प्रेरणेतून व प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी, विविध क्रीडा प्रकारांतून प्रतिभावान खेळाडू घडावेत, या उद्देशाने ‘विश्वनाथ स्पोर्ट्स मीट’ची सुरुवात करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे राज्य व देशाच्या क्रीडा संस्कृतीला मोलाचा हातभार लागणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत देशातील १३५ हून अधिक शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमधील ५,००० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होत असून, १५ विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपली प्रतिभा सादर करणार आहेत. स्पर्धेच्या कालावधीत विद्यापीठ परिसरात दररोज १०,००० हून अधिक खेळाडू व प्रशिक्षकांचा वावर असणार आहे.
क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, टेनिस, टेबल टेनिस, खो-खो, वॉटर पोलो, स्विमिंग (इनडोअर), बॉक्सिंग, आर्चरी (पुरुष/महिला) आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. क्रिकेट स्पर्धेसाठी १२ विद्यापीठांचे संघ सहभागी होत असून, विजेत्या व उपविजेत्या संघांसाठी १० लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेसाठी राज्य व देशातून येणाऱ्या खेळाडूंसाठी निवास, भोजन व वैद्यकीय सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या नावनोंदणी सुरू असून, अधिकाधिक खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., सचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा संचालक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. पद्माकर फड तसेच डॉ. प्रतिभा जगताप यांनी केले आहे.#कर सर मैदान फतेह !

21
1796 views