नायलॉन मांजा विक्री-वापरावर कठोर कारवाई; ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ अंतर्गत गुन्हा दाखल होणार – जळगाव पोलिसांचा इशारा
जळगाव | प्रतिनिधीआगामी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन अथवा सिंथेटिक मांजाची विक्री किंवा वापर केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ११० – ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ या गंभीर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला जाईल, असा कडक इशारा जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिला आहे.नायलॉन मांजा हा मानवी जीवन व पक्ष्यांसाठी अत्यंत घातक असून, दरवर्षी घसा कापला जाणे, अपघात होणे तसेच पक्ष्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. हे माहिती असूनही नफ्यासाठी नायलॉन मांजाची विक्री केल्यास तो गुन्हा ठरेल. हा गुन्हा अजामीनपात्र (Non-bailable) असून, दोषी आढळल्यास १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.पोलिसांची विशेष मोहीमजिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथके (Special Squads) तैनात करण्यात आली असून, पतंग व मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली जाणार आहे. केवळ दुकानेच नव्हे, तर गोदामे व घरांमध्ये साठवलेला नायलॉन मांजाही जप्त करण्यात येणार आहे.विक्रेत्यांना नोटिसाजिल्ह्यातील पतंग विक्रेत्यांना BNS तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार नोटिसा बजावण्यात आल्या असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार आहे.नागरिकांना आवाहननागरिकांनी व पालकांनी आपल्या मुलांना नायलॉन मांजा वापरण्यापासून रोखावे. नायलॉन मांजा तुटत नसल्याने दुचाकीस्वारांच्या गळ्याला फास लागून गंभीर अपघात होतात. तसेच वीज तारांवर अडकून शॉर्ट सर्किट होण्याचाही धोका असतो.तक्रार कुठे करावी?आपल्या परिसरात कुणी नायलॉन मांजाची विक्री करत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.लागू होणारे कायदेशीर कलमBNS कलम ११० – सदोष मनुष्यवधाचा प्रयत्नBNS कलम २२३ – जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघनपर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ व १५ – ५ वर्षांपर्यंत शिक्षा व २ लाख रुपयांपर्यंत दंडजळगाव पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नायलॉन मांजाविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.