logo

फ्लाय९१ नांदेडमध्ये विमानसेवा सुरू करण्याच्या अंतिम टप्प्यात; लवकरच तारखा जाहीर

आपल्या वाढत्या प्रादेशिक नेटवर्कमध्ये विजयवाडा, राजमुंद्री, नांदेड, दाबोळी आणि हुबळी या शहरांचा समावेश.

नांदेड, जानेवारी २०२६: प्रादेशिक हवाई संपर्काला नवे बळ देत फ्लाय९१ या प्रादेशिक विमानसेवेने नांदेडसह टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये विस्ताराची घोषणा केली आहे. या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर फ्लाय९१ने यूएई मुख्यालय असलेल्या जागतिक विमानसेवा प्रदाता दुबई एअरोस्पेस एंटरप्राइझ (DAE) कडून दोन अत्याधुनिक ATR 72-600 टर्बोप्रॉप विमाने भाडेतत्त्वावर घेतली आहेत.

या दोन नव्या विमानांची डिलिव्हरी या महिन्याच्या उत्तरार्धात फ्रान्समधील टुलूज येथील ATRच्या उत्पादन केंद्रातून होणार असून, जानेवारी २०२६मध्ये ही विमाने ताफ्यात दाखल होतील. या विमानांच्या समावेशानंतर फ्लाय९१ आपल्या उड्डाण क्षमतेत आणि फेऱ्यांच्या वारंवारतेत वाढ करणार आहे.

या विस्तार योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील नांदेड हे फ्लाय९१च्या प्रादेशिक नेटवर्कमधील एक महत्त्वाचे गंतव्यस्थान ठरणार आहे. नांदेडसोबतच कर्नाटकातील हुबळी, आंध्रप्रदेशातील विजयवाडा व राजमुंद्री तसेच गोव्यातील दाबोळी या शहरांचा समावेश वाढत्या नेटवर्कमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे नांदेडचा गोवा, दक्षिण भारत आणि इतर प्रमुख शहरी केंद्रांशी हवाई संपर्क अधिक सुलभ होणार आहे.

नवीन दोन ATR 72-600 विमानांच्या समावेशानंतर फ्लाय९१च्या ताफ्यातील एकूण विमानांची संख्या सहा होईल. टियर-२ आणि टियर-३ शहरांपर्यंत हवाई सेवा पोहोचवण्याच्या कंपनीच्या ठोस धोरणाला हा टप्पा अधिक बळ देणारा असून, नांदेडसारख्या महत्त्वाच्या प्रादेशिक शहरासाठी हा हवाई संपर्क विकासाचा निर्णायक टप्पा ठरणार आहे.

या संदर्भात फ्लाय९१चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको म्हणाले,
“नियंत्रित आणि टप्प्याटप्प्याने वाढ साधत सक्षम व विस्तारक्षम प्रादेशिक विमानसेवा उभारण्याच्या आमच्या वचनबद्धतेला हा व्यवहार अधिक बळ देतो. ATR 72-600 हे अल्प पल्ल्याच्या मार्गांसाठी कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि उत्कृष्ट कामगिरी देणारे विमान असून, नांदेडसारख्या शहरांना राष्ट्रीय हवाई जाळ्याशी जोडण्यात त्याची भूमिका महत्त्वाची ठरेल. डीएईसोबतची भागीदारी आर्थिक शिस्त राखत ताफा विस्तारण्यास आम्हाला मदत करेल.”

फ्लाय९१च्या ताफा धोरणाचा कणा ठरलेले ATR 72-600 विमान सिद्ध टर्बोप्रॉप अर्थकारण, कमी अंतरात सुरक्षित टेकऑफ व लँडिंग करण्याची क्षमता तसेच दुय्यम व दुर्लक्षित विमानतळांवर प्रभावीपणे कार्य करण्याच्या क्षमतेमुळे विशेष ठरते. ही वैशिष्ट्ये नांदेडसारख्या प्रादेशिक विमानतळांसाठी विशेष उपयुक्त आहेत.

मार्च २०२४मध्ये व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात केल्यानंतर फ्लाय९१ने गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला सोलापूर, जळगाव आणि लक्षद्वीपमधील अगत्तीशी जोडले आहे. तसेच पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरी केंद्रांशीही जोडणी उपलब्ध करून दिली आहे. आता नांदेडच्या समावेशामुळे मराठवाड्याचा हवाई नकाशावर ठसा अधिक ठळक होणार आहे.

२०२५मध्ये फ्लाय९१ ही भारतातील पहिली प्रादेशिक विमानसेवा ठरली जिने एकाच वेळी दोन ATR 72-600 विमानांची ऑर्डर दिली, ज्यामुळे देशांतर्गत प्रादेशिक विमानवाहतूक क्षेत्रात नवा मानदंड निर्माण झाला.

0
12 views