logo

शिक्षक–विद्यार्थी नात्याची उजळणी; एकात्मता माध्यमिक विद्यालयात २९ वर्षांनंतर गेट-टुगेदर


शिक्षक–विद्यार्थी नात्याची उजळणी; एकात्मता माध्यमिक विद्यालयात २९ वर्षांनंतर गेट-टुगेदर


गेट-टुगेदरच्या निमित्ताने जपलं शिक्षक–विद्यार्थी नातं; एकात्मता विद्यालयात भावनिक मेळावा

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
एकात्मता माध्यमिक विद्यालय, शहापूर येथे तब्बल २९ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा ‘गेट-टुगेदर’ कार्यक्रम उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश बालपणातील निरागस क्षण, शालेय आठवणी आणि आजच्या धकाधकीच्या जीवनातील बदल यांचा वेध घेणे हा होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक माजी विद्यार्थ्यांना हे प्रकर्षाने जाणवले की, आयुष्याच्या धावपळीत आपण स्वतःचा आनंदमय जीवन जगण्याचा विसर पाडून बसलो आहोत.

या गेट-टुगेदरने मनातील दडलेला आनंद व्यक्त करण्याचे, जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे आणि मैत्रीचे बंध पुन्हा दृढ करण्याचे एक रहस्यमय व प्रेरणादायी साधन म्हणून काम केले. बालपणीच्या खोड्या, शाळेतील किस्से, यश-अपयशाचे अनुभव आणि आयुष्याच्या प्रवासातील चढउतार यांची मनमोकळी देवाणघेवाण यावेळी झाली.

कार्यक्रमात एकात्मता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, शिस्त आणि प्रेरणा असल्याचे सांगत सर्व शिक्षकांचे कृतज्ञतेने आभार मानले. या प्रसंगी शिक्षक–विद्यार्थी नात्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की, क्रीडा, कला, शिक्षण किंवा कोणतीही स्पर्धा असो—विद्यार्थ्यांनी मनापासून ज्ञान संपादन केले, तर कोणत्याही क्षेत्रात यश निश्चित मिळू शकते. विद्यार्थी केवळ ज्ञान घेणारा न राहता, त्या ज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून समाजाला व इतरांना रोजगार देणारा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

आपल्या विद्यार्थ्यांमध्ये झालेला सकारात्मक बदल, त्यांनी आयुष्यात मिळवलेले यश पाहून शिक्षकांचे मन कृतकृत्य व आनंदाने भरून येते. “मी घेतलेली मेहनत, दिलेले संस्कार आणि शिकवलेले धडे जर एखाद्या विद्यार्थ्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतात, तेव्हा त्या शिक्षकांचा आनंद गगनात मावत नाही,” अशी भावना यावेळी व्यक्त झाली.

हा गेट-टुगेदर कार्यक्रम म्हणजे केवळ एक मेळावा नव्हता, तर शिक्षक–विद्यार्थी नात्याची आयुष्यभर टिकणारी ‘लाईफलाईन’ पुन्हा एकदा अनुभवण्याचा अविस्मरणीय क्षण ठरला.

6
984 views