logo

प्रेम प्रकरणाच्या संशयावरून डिप्लोमाच्या विद्यार्थ्याचा खून

जळगाव : मैत्री म्हणून बोलणे असलेल्या तरुणीसोबत जय उर्फ साई गणेश गोराडे (१८, रा. दशरथनगर) याचे प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून त्याच्यावर चॉपरने वार करण्यात आले, उपचार सुरू असताना या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (३१ डिसेंबर) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी शुभम रवींद्र सोनवणे (२५, रा. चौघुले प्लॉट) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

दशरथनगरमधील जय गोराडे हा तरुण देवकर महाविद्यालयात डिप्लोमा द्वितीय वर्षाला होता. त्याच्या वर्गातील एक विद्यार्थिनी त्याची मैत्रीण असून, तिचे व जयचे प्रेमप्रकरण असल्याचा संशय शुभम सोनवणे याला होता.

बुधवारी, दुपारी जय हा गोलाणी मार्केटमध्ये आला असताना शुभम व त्याच्यात भांडण होऊन झटापट झाली. शुभमने चॉपरने जयवर वार केले. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याचे मित्र व परिसरातील रहिवाशांची रुग्णालयात गर्दी झाली होती

मारेकऱ्याला पकडले

घटना घडली त्यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी रमेश चौधरी हे तेथून जात असताना त्यांना शुभम हा जयवर चॉपरने वार करीत असल्याचे दिसले. त्यांनी शुभमला पकडून ठेवले व शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली, त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी व त्यांचे सहकारी तेथे पोहोचले

0
563 views