
विरदेलच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा:
'देवकर विद्यालयाची' राज्यस्तरीय स्पर्धेत धडक!
(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
विभागीय शैक्षणिक क्लब स्पर्धेत 'परदेशी भाषा क्लब' प्रथम; विद्यार्थ्यांच्या गरुडभरारीने तालुक्याचे नाव उज्ज्वल...
शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त श्रीमंत गोविंदराव संपतराव देवकर विद्यालय, विरदेल (ता. शिंदखेडा) या विद्यालयाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
नंदुरबार येथे आयोजित विभागीय स्तरीय 'विविध शैक्षणिक क्लब सादरीकरण' स्पर्धेत विद्यालयाच्या 'फॉरेन लँग्वेज क्लब' (Foreign Language Club) ने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी थेट जागतिक भाषांवर मिळवलेले प्रभुत्व पाहून उपस्थित मान्यवरांनी विरदेलच्या या 'गरुडभरारी'चे विशेष कौतुक केले.विद्यालयाच्या या यशाने सातासमुद्रापारच्या भाषांचा 'विरदेल'मध्ये डंका पिटला आहे
याअभिनव स्पर्धेत विद्यालयाचे राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक पुरस्कार प्राप्त गुणी व उपक्रमशील, कल्पक, रंजक आणि प्रभावी अध्यापनासाठी तसेच शिक्षकांच्या अनेक प्रशिक्षण वर्गात तज्ञ मार्गदर्शक म्हणून सुपरिचित असलेले श्री. सुनील चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली 'परदेशी भाषा क्लब'चे सादरीकरण करण्यात आले. अत्यंत कल्पकतेने तयार केलेल्या या क्लबमध्ये विद्यार्थ्यांनी केवळ भाषांचे ज्ञानच दिले नाही, तर त्या संस्कृतीचे दर्शनही घडवले.
सहभागी विद्यार्थी प्रतिनिधी:
नैतिक बेहेरे, चिन्मय चौधरी, सागर मगरे, मनिष बेहेरे, उबेद खाटीक आणि प्रथमेश शिंदे.
या विद्यार्थ्यांनी जर्मन, फ्रेंच, रशियन, चिनी, जपानी, अरबी, इटालियन, पोर्तुगीज, आफ्रिकन तसेच आपल्या संस्कृतीची जननी असलेल्या संस्कृत आणि शेजारील नेपाळी अशा विविध भाषांतून संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. ग्रामीण भागातील मुलांनी जागतिक स्तरावरील भाषा इतक्या आत्मविश्वासाने सादर केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
या उज्वल यशा निमित्ताने सर्व स्तरातून सर्व गुणी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव आणि मान्यवरांची शाबासकी प्राप्त होत आहे.
विद्यालयाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब ॲड. श्री. एस. बी. देवकर आणि सचिव बाळासाहेब ॲड. श्री. बी. एस. देवकर यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
तसेच शिंदखेडा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री. डी. एस. सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. एस. पी. चौधरी, विरदेल केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. गुलाब सोनवणे, केंद्रप्रमुख सौ. बच्छाव मॅडम यांनी या यशाची दखल घेत विद्यालयाला शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाच्या यशाचे शिल्पकार
या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. एस. पाटील, पर्यवेक्षक श्री. एस. एस. गोसावी, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. आर. एच. ठाकूर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे मोलाचे योगदान लाभले. विरदेल ग्रामस्थांनीही आपल्या गावच्या शाळेने राज्य स्तरावर नाव नेल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
"ग्रामीण भागातील टॅलेंटला योग्य दिशा मिळाली, की ते जागतिक स्तरावर चमकू शकते, हे या निकालाने सिद्ध केले आहे. आता आमचे लक्ष्य राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचे आहे."
अशी आशा प्रशासकीय समिती, देवकर विद्यालय विरदेल यांनी व्यक्त केली आहे