logo

बीड: हांगेवाडी येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; लाखोचा ऐवज लंपास

तालुक्यातील हांगेवाडी गावात भरदिवसा धाडसी घरफोडीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदाशिव मारुती हांगे (वय ६०) हे शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात कामासाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला.
चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच रोख ६० हजार रुपये असा एकूण सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. घरात अस्ताव्यस्त सामान पडलेले दिसून आले.
शेतातून परत आल्यानंतर सदाशिव हांगे यांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
गावात यापूर्वीही किरकोळ चोरीच्या घटना घडल्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा चोरी होत असल्याने पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

18
723 views